पुणे : महापालिकेचे ‘मु. मा. दाते मुद्रणालय’आता इतिहासजमा होणार आहे. त्याठिकाणी अद्ययावत असे शहर ग्रंथालय (सिटी लायब्ररी) उभे केले जाणार आहे. पालिकेच्या भवन रचना विभागाकडून त्याकरिता तब्बल ७ कोटी ९७ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात शहरासह परजिल्ह्यातील वाचनप्रेमींना याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाचन साहित्य उपलब्ध होणार आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी घोले रस्त्यावर हे मुद्रणालय आहे. घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, महापौर निवास आणि बालगंधर्व रंगमंदिर अशा महत्वाच्या ठिकाणांपासून अगदी हाकेच्या अंतरावर हे मुद्रणालय आहे. पालिकेच्या विविध विभागांना लागणारे छापील साहित्य येथेच छापले जाते. याच मुद्रणालयात आजवरची सर्व अंदाजपत्रके छापली गेली असून पत्रे, लेटरहेड्स, व्हिजीटींग कार्ड आदींची छपाई याठिकाणी होते. कमी वेळामध्ये दर्जेदार छपाई आणि बांधणीसाठी हे मुद्रणालय प्रसिद्ध आहे. आता हे मुद्रणालय पाडण्यात येणार आहे. त्याठिकाणी नवीन टोलेजंग इमारत उभारली जाणार आहे.
शिवाजीनगर तसेच मध्यवर्ती भागातील शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, स्पर्धा परिक्षा केंद्र, खासगी संस्थांमधील विद्यार्थ्यांना याठिकाणी अभ्यासासाठी जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासोबतच त्यांच्यासाठी संदर्भ साहित्याचे दालनही उभारले जाणार आहे. विद्यार्थ्यांसह अभ्यासक आणि पुस्तकप्रेमीही त्याचा लाभ घेऊ शकणार आहेत. दाते मुद्रणालयातील छपाईसाठी जुनी यंत्रणा आणि कार्यपद्धती वापरली जाते आहे. आधुनिक ग्रंथालयाच्या माध्यमातून मुद्रणालयातील छपाईसाठी आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र याठिकाणी पुन्हा मुद्रणालय उभारणार की अन्य ठिकाणी हलविले जाणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही.