पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची २१ मेला पुण्यात होणारी सभा रद्द झाली होती. राज ठाकरे पुण्यातील मनसैनिकांना संबोधित करणार होते. परंतु पावसाचं कारण देत ही सभा रद्द करण्यात आली असल्याचं सुत्रांकडून सांगण्यात आले. मनसेकडून डेक्कन पोलिसांना सभा रद्द झाल्याचं पत्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पाठवण्यात आले. शनिवारी राज ठाकरेंची सभा मुठा नदी पात्रात होणार होती. आता पुण्यात रविवारी २२ मेला सभा होणार असल्याची माहिती मनसे नेत्यांनी दिली आहे. पण उद्यापर्यंत सभेचे ठिकाण आणि वेळ याची अधिकृत माहिती मनसेकडून जाहीर करणार येईल असेही त्यांनी सांगितले आहे. सकाळच्या वेळेत सभा होण्याची शक्यता कार्यकर्त्यांकडून वर्तवली जात आहे.
येत्या १० दिवसांच्या आत राज ठाकरेंची सभा पुण्यात होईल असे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. शनिवारी हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवल्याने राज ठाकरेंच्या सभेचा दिवस बदलण्यात आला असल्याचे सुत्रांकडून समजल होत. स्वतः राज ठाकरे पुण्यातील सभेबद्दल माहिती देतील असंही सांगण्यात आले होते. २१ मेला होती सभा
राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन शनिवारी २१ मेला डेक्कन जिमखाना येथील मुठा नदी पात्रातील जागेत पुणे शहर मनसे कडून करण्यात आले होते. त्याकामी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे शहरात सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पुणे शहर सरचिटणीस अजय शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली होती. पुढील आठवड्यात राज ठाकरेंचा पुणे दौरा निश्चित झाला होता. त्यानिमित्ताने २१ ते २८ मे दरम्यान त्यांचा पुणे दौरा होणार असून याच कालावधीत पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे राज ठाकरेंची सभा होणार असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली होती. त्यासाठी पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पोलीस आयुक्तांना परवानगीचे पत्र पाठवले होते. पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविदयालय येथे सभेचे आयोजन करण्यात येणार होते. पण वाहतूक समस्या निर्माण होऊ नये. या दृष्टीने डेक्कन जिमखाना येथील मुठा नदी पात्रातील जागा निश्चित करण्यात आली असल्याचे अजय शिंदे यांनी सांगितले होते.