पुणे : विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे काही 15 ते 20 दिवस राहिल्याने सर्वच पक्ष प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पुण्यातून निवडणूक लढवत असल्याने पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या पुण्यात सभा हाेण्याची शक्यता हाेती. त्यावर आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिक्कामाेर्तब केला असून 17 तारखेला माेदी पुणे आणि सातारा येथे सभा घेणार आहेत.
21 ऑक्टाेबरला विधानसभेच्या निवडणुका हाेत असून 24 तारखेला काेणाचे सरकार सत्तेत येणार याचे चित्र स्पष्ट हाेणार आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुण्यातील आठही मतदारसंघामध्ये भाजपाचे आमदार निवडुण आले हाेते. यंदा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपासाठी सेफ समजल्या जाणाऱ्या काेथरुड विधानसभा मतदार संघातून ते निवडणुक लढवत आहेत. त्यांच्या उमेदवारीला सुरुवाती पासूनच विराेध झाला.
युतीत भाजपाने पुण्यातील एकही जागा शिवसेनेला दिलेली नाही. पुण्यातील आठही जागांवर भाजपाचे उमेदवार निवडणुक लढवत आहेत. त्यामुळे नरेंद्र माेदींची सभा पुण्यात हाेईल अशी शक्यता वर्तवण्यात येत हाेती. त्यातच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून देखील त्याबाबतची मागणी करण्यात येत हाेती. माेदी 17 तारखेला पुण्यात सभा घेणार आहेत. याच दिवशी ते सातारा येथे देखील सभा घेणार आहेत. सकाळी सातारा येथील सभा झाल्यानंतर दुपारी त्यांची पुण्यात सभा हाेणार आहे. तसेच राज्यात माेदींच्या एकूण 9 सभा हाेणार आहेत. अमित शहा यांच्या राज्यात एकूण 18 सभा हाेणार आहेत, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.