पुणे : पुण्यातील स्वारगेट येथील अत्याचाराच्या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी तिसऱ्याच दिवशी त्याच्या गावातून अटक केली. आणि तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दत्तात्रय गाडे असं या प्रकरणातल्या आरोपीचं नाव आहे. दरम्यान या घटनेनंतर आरोपीच्या नातेवाईकांकडून आणि वकीलांकडून वेगवेगळे दावे देखील करण्यात आले होते. त्यामुळे पीडितेच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. आणि त्यामुळे पीडितेची नाहक बदनामी झाल्याचा आरोपही या पीडितेनं केलाय.
पुण्यातील गजबजलेल्या स्वारगेट बस स्थानकावर एका बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेचे पडसाद संबंध राज्यभरात उमटले. ठिकठिकाणी आंदोलनंही झाली. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर सुरक्षा रक्षकांच्या कार्यालयाची तोडफोड सुद्धा करण्यात आली होती. आणि या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला आणखी गती दिली. यानंतर या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा मूळ गावी पळून गेला होता. तब्बल तीन दिवस प्रयत्नानंतर आरोपी दत्ता गाडीला पोलिसांनी अटक केली होती.
लवकरात लवकर कठोर शिक्षा द्या
पुणे कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना आता या प्रकरणातील तरुणीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली आहे. पुणे बलात्कार प्रकरणातील पीडितेनं विधानभवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेतल्यानं पुन्हा या प्रकरणाची आता चर्चा होऊ लागली आहे. यावेळी एकनाथ शिंदे आणि नीलम गोऱ्हे यांनी पीडितेच्या तब्येतीची विचारपूस केली. पीडित तरुणीने आपली व्यथा त्यांना सांगितली. आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्याची मागणीही तिने केली.
शिंदेंची न्याय देण्याची ग्वाही
दरम्यान पीडित महिलेची व्यथा ऐकल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिला लवकरात लवकर न्याय देण्याची ग्वाही सुद्धा दिली आहे. राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी सर्वतोपरी मदत करत असल्याचंही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी तरुणीला सांगितलंय. या भेटीनंतर पीडित महिलेला लवकरात लवकर न्याय मिळावा या संदर्भात नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील चर्चा केली आहे. दरम्यान या संपूर्ण आता लवकरात लवकर सुनावणी होऊन आरोपीला कठोरात कठोर शासन कधी मिळणार आणि या पीडितेला न्याय कधी मिळणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.