सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यातील प्रसिध्द श्री क्षेत्र नारायणपूर येथे श्री. दत्त जन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिरात देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेले हजारो भाविक, टाळ -मृदंगाच्या गजर, मंदिरात केलेली विविध रंगी फुलांची सजावट, ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चे गजरात आणि फुलांची उधळण करीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत प.पू .नारायण महाराज यांचे अधिपत्याखाली सोमवार, दिनांक २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजून ०३ मिनिटांनी मोठ्या उत्साहात दत्त जन्म सोहळा पार पडला.
पहाटे दत्त मंदिर व नारायणेश्वर मंदिरात देवांना रुद्रभिषेक झाला. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यांत आली होती. दत्त जन्मा अगोदर पोपट महाराज टेंबे स्वामी व वैभवकाका काळे यांचे दत्त जन्माचे आख्यान झाले. त्या नंतर फुलांचे वाटप, पाळणा, नाव ठेवणे तसेच सुंठवडा वाटप हा कार्यक्रम झाला. यावेळी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागताचा कार्यक्रम झाले.
या वेळी आमदार संजय जगताप, माजी आमदार उल्हास पवार, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, तात्यासाहेब भिंताडे, डॉ. उमेश कुमार डोंगरे, प्रशांत पाटणे,मंदिर व्यवस्थापक भरत क्षीरसागर, प्रदीप पोमण, प्रकाश पवार, गणेश जगताप, सरपंच प्रदीप बोरकर, रामभाऊ बोरकर, अजित बोरकर, सिद्ध भारूडकार लक्ष्मण राजगुरू, बाळासाहेब भिंताडे, जालिंदर कामठे, भोर उपविभागीय पोलिस अधिकारी अंकुश बर्डे, तहसीलदार विक्रम राजपूत, पोलिस निरीक्षक संतोष जाधव, दादा भुजबळ, रामदास मेमाणे आदी उपस्थित होते.
शाही मिरवणुकीने होणार सांगता -
तीन दिवस चाललेल्या श्री दत्त जयंती सोहळ्याची शाही मिरवणुकीने सांगता होणार आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे पूजा होऊन ब्रम्हा विष्णू महेश यांचे मुखवटे फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये ठेवण्यात येतील. त्यानंतर ग्रामप्रदक्षिणा, कुंडावर मुखवटे, आणि पादुका यांना महास्नान घालण्यात येईल. तर भाविकांना महाप्रसाद देऊन सोहळ्याची सांगता होईल.