पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला त्याच्या गावातच गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. १०० ते २०० पोलिस तेवढ्याच प्रमाणात स्थानिक ग्रामस्थ, श्वान पथक आणि ड्रोनची मदतही घेतली गेली. मात्र, आता या अटकेवरून श्रेयवादाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. केवळ शहर आणि ग्रामीण पोलिसच नाही, तर पोलिस आणि ग्रामस्थ यांच्यातही ही लढाई सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व घडामोडींमुळेच गाडेला तब्बल ६० तासांचे अभय मिळाल्याचे समोर येऊ लागले आहे.
स्वारगेट बसस्थानकात मंगळवारी पहाटे दत्तात्रय गाडेने तरुणीवर अत्याचर केला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शहर पोलिसांनी तात्काळ त्याची ओळखही पटवली. त्याचे गुनाट (ता. शिरूर) गावही शोधले. मात्र, एवढे सर्व करत असताना शिरूरच्या पोलिसांना याबाबत काहीही सांगितले नाही. स्थानिक पोलिसांना लगेच कळवले असते, तर अवघ्या काही तासांतच गाडेला गजाआड करण्यात यश आले असते. मात्र, तसे काही झाले नाही. दत्तात्रयने गावातील काल्याच्या कीर्तनात हजेरी लावली. ज्यावेळी गुनाट गावात दुपारी शहर पोलिस आल्याचे दिसताच दत्तात्रयने शेताच्या दिशेने पळ काढला. त्यानंतर १३ पथकांच्या साहाय्याने सुरू झाला शहर पोलिसांचा तपास. गुन्हे शाखा विभाग, स्वारगेट पोलिस पथक, झोन २ चे पथक गुनाट गावात तळ ठोकून बसले होते. गावातील काही जणांची धरपकड करून त्यांच्याकडून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली; पण हाती काही लागले नाही. दुसरीकडे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि शिरूर पोलिसांच्या काही कर्मचाऱ्यांनीदेखील गुनाट गावातच तळ ठोकला; पण या कर्मचाऱ्यांकडून अप्रत्यक्षपणे मदत नाकारली. जे-जे अधिकारी तेथे दाखल झाले त्यांच्यातही समन्वयाचा अभाव असल्याचे निदर्शनास येत होते आणि याच परिस्थितीचा दत्तात्रय गाडेने फायदा उचलला.
गावाच्या आजूबाजूला ऊसशेतीचे मोठे क्षेत्र आहे. याच ऊसशेतीचा त्याला लपायला फायदा झाला. मंगळवार आणि बुधवारचा दिवस दत्तात्रयचे लोकेशन शोधण्यातच गेले. गावच्या परिसरात पोलिस असतानाही गाडे बिनदिक्कत फिरत असल्याचीही चर्चा सुरू झाली. गावातील काही लोकांकडे त्याने खाणे- पिणे केले; पण शहर पोलिसांना त्याला पकडणे शक्य झाले नाही. गुरुवारी सकाळपासून गावात श्वानपथक आणि ड्रोनद्वारे त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. श्वानपथकाने गाडेचा माग काढला; पण ऊस शेतात घुसण्याचे धाडस मात्र झाले नाही. काही स्थानिक आतमध्ये गेले; पण त्यांच्या हाती काही लागले नाही.
...तर यापूर्वीच झाला असता गजाआड
शोधमोहिमेसाठी तुकडीही बोलवली. मात्र, अगदी निवांतपणे पाटावर, शेताच्या बाजूने शोधमोहीम सुरू होती. ड्रोनमध्येही काही दिसले नाही, तसेच सायंकाळ झाल्याने शोधमोहीम थांवबली. दरम्यानच्या काळामध्ये स्थानिक पोलिस आणि ग्रामीण गुन्हे शाखेने स्थानिक लाेकांना विश्वासात घेत त्यांनी गाडेला पकडण्यासाठी जोर लावला होता; पण त्याचा कुठेही उल्लेख नाही. स्थानिक पोलिसांनी दत्तात्रय गाडेला दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केल्याने त्याची इत्थंभूत माहिती होती; परंतु शहर पोलिसांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. शिवाय डोंगरात, शेतांमध्ये आरोपीला पकडण्याचे तंत्रही शहर पोलिसांकडे नव्हते. केवळ ‘आम्हीच ग्रेट’मध्ये गाडेला ६० तासांचे अभय मिळाले. थोडी जरी स्थानिक पोलिसांची मदत घेतली असती, तर तो कधीच गजाआड झाला असता, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
पुणे पोलिसांच्या शोधमोहिमेवर प्रश्नचिन्ह
दत्तात्रय गाडेने गावात राजकीय वरदहस्ताने दहशत निर्माण केेली होती. तंटामुक्त समितीच्या निवडणुकीत गाडेने एकावर चाकूही उगारला होता. त्या वर्तनाने गावातील लोक वैतागले होते. नेमकी ही घटना घडली आणि स्थानिक पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी गावकऱ्यांकडे मदत मागितली. अखेर गावातील काही लोकांनी चंदनवस्ती येथील एका विहिरीवर बसलेल्या दत्तात्रयला चोहोबाजूंनी घेरत त्याला पकडले. मात्र, या ठिकाणी शहर पोलिसांनी त्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याने गावकरी आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली. असे सर्व घडले असतानाही पुणे पोलिस स्वत: शाबासकीची पाठ थोपटत असल्याने त्यांच्या शोधमोहिमेवरच आता प्रश्न निर्माण झाला आहे.