पुणे : हडपसर येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आबासाहेब ऊर्फ दत्तात्रय धोंडो मगर (वय ९१) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. क्रेडाई, नॅशनलचे अध्यक्ष आणि मगरपट्टा सिटी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांचे ते वडील होत.
पुणे महानगरातील आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. ५ जून १९३१ साली जन्मलेल्या आबासाहेब मगर यांचा जन्म झाला. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,पुणे मधून १९५६ साली आपली स्थापत्य अभियांत्रिकेची पदवी संपादन केली होती.
आबासाहेब मगर हे मगरपट्टा सिटी समूहाचे संस्थापक संचालक, अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे संचालक, मराठा शिक्षण प्रसारक मंडळीचे ते आजीव सदस्य होते. कराड अर्बन बँकेचे संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. तसेच पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशनेचे ते खंबीर पाठीराखे होते.
आमदार रोहित पवारांची सोशल मीडियावर पोस्ट
कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट द्वारे माहिती दिली आहे. त्यात सासरे श्री. सतीश (दादा) मगर यांचे वडील आणि मगर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आबासाहेब उर्फ दत्तात्रय धोंडो मगर (आबा) यांचं निधन झालं. हा क्षण आमच्या पवार आणि मगर कुटुंबासाठी अत्यंत दुःखद आणि कठीण आहे. आबांच्या आत्म्यास चिरशांती लाभो! भावपूर्ण श्रद्धांजली! असा उल्लेख केेेला आहे.