पुणे: तरुणीवर बलात्कार करून पसार झालेला आरोपी दत्तात्रय गाडे याचा पोलिसांच्या पथकाकडून शोध सुरु आहे. या प्रकरणात खळबळजनक माहिती समोर येऊ लागली आहे. गाडेचे शिरूरच्या राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्या बॅनरवर त्याचे फोटो दिसून आले आहेत. तर आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्यासोबतचे अनेक फोटोही समोर आले आहेत. या प्रकरणात अशोक पवार यांच्याकडून एक गंभीर आरोप करण्यात आला आहे . आरोपी दत्तात्रय गाडे याने शिरूरमधून उजैन यात्रेचे नियोजन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पवार म्हणाले, आरोपीने स्वारगेट परिसरात घृणास्पद काम केलंय. तो उजैन यात्रेला कोणाला मदत करत होता? कोणत्या महिलांना घेऊन चाललं होता. याची सखोल चौकशी व्हावी असे पवार यांनी सांगितले आहे. उजैनला हा गेल्यावर त्याच मोबाईल, रेकॉर्ड मागणी पोलिसांनी मागवून घ्यावी. असे अनेक जण त्या उजैन मध्ये सहभागी झाले होते. त्याचे हितसंबंध कोणाकोणाशी जोडले आहेत हे शोधणं गरजेचं आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करता येते का? याचा शोध पोलिसांनी घ्यायला हवा. अशा आरोपीला फाशीची शिक्षा द्यायला हवी.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातून महिलांसाठी उजैन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. एका राजकीय नेत्याने हे आयोजन केल्याचे अशोक पवार यांनी सांगितले आहे. त्या यात्रेचे नियोजन गाडेने केल्याचा खळबळजनक आरोप पवार यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गाडेचे राजकारणी, पोलिस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे समोर आल्याने अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.