पुणे : घरातून एका तरुणीच्या रडण्याचा आवाज येत होता. त्यामुळे गल्लीतील लोकांना संशय आला. त्यांनी घराला बाहेरून कडी लावली व पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. त्यानंतर दत्तवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घराचा दरवाजा तोडून पीडित तरुणीची सुटका करून चौघांना अटक केली. नागरिकांच्या जागरूकतेमुळे सामूहिक बलात्काराचा हा प्रकार उघडकीस आला असून, ही घटना जनता वसाहतीत शुक्रवारी सायंकाळी पावणेसहा वाजता घडली.
श्रीकांत सुरेश सरोदे (वय ३६), आदित्य ऊर्फ मन्या सुरेश पवार (वय १९), दुर्वेश ऊर्फ पप्पू संतोष जाधव (वय ३६) आणि आशिष ऊर्फ विजय राकेश मोहिते (वय १८, सर्व रा. गल्ली नंबर ८, जनता वसाहत, पर्वती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पीडित २५ वर्षांची तरुणी कात्रज येथे राहते. ही तरुणी शुक्रवारी सायंकाळी स्वारगेटवरून घरी जात होती. दुर्वेश जाधव याने या तरुणीला जनता वसाहतीतील आपल्या घरी आणले. त्यानंतर इतर तिघांना बोलावून घेतले. या चौघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या वेळी या तरुणीच्या ओरडण्याचा आवाज आजूबाजूच्या महिलांनी ऐकला. परिसरातील महिलांची घराबाहेर एकच गर्दी झाली. त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. त्याबरोबर दत्तवाडी पोलीस ठाण्यातील मार्शल पोलीस अंमलदार अमोल झणझणे व जनाजी श्रीमंगले हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. तेव्हा घर आतून बंद होते. पाठोपाठ दत्तवाडी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक खांडेकर, अंमलदार मोरे, कळसकर, महिला अंमलदार गायकवाड हे मदतीला आले. दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी धक्का देऊन दरवाजा उघडला. तर आत एक तरुणी व चार तरुण अर्धनग्न अवस्थेत होते. घाबरलेल्या या तरुणीला महिला पोलिसांनी धीर दिला. पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.
या तरुणीने चौघांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा जबाब दिला. पोलीस अंमलदार अमोल झणझणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे.
आरोपींपैकी श्रीकांत सरोदे हा दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध खुनाचा व जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, हवालदार कुंदन शिंदे, राजू जाधव, अंमलदार गणेश कळसकर, अमोल झणझणे, जनाजी श्रीमंगले, शिवाजी क्षीरसागर, शरद राऊत, अमित सुर्वे, अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले, दयानंद तेलंग, भारत आस्मार, प्रमोद भोसले, विष्णू सुतार यांनी ही कामगिरी केली.