भोर : भोर तालुक्यातील जयतपाड येथे भाटघर धरणाच्या बॅकवॉटरला वर्गमैत्रिणीच्या कुटुंबासोबत आलेल्या मुलगी आणि तिच्या वडिलांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी (वय १३) व शिरीष मनोहर धर्माधिकारी (वय ४५ दोघे रा औंध पुणे) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत भूषण वामण फालक( वय ४३ रा.बालेवाडी) पुणे यांनी फिर्याद दिली आहे.
भोर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या धर्माधिकारी तिचे आई - वडील काल १५ ऑगस्टच्या सुटटीमुळे इतर दोन मैत्रीणी व तिचे कुंटुबीयसोबत सिमा फार्म मौजे जयतपाड ता.भोर येथे पर्यटनासाठी आले होते. दरम्यान दुपारी ४.३० वाजता सिमा फार्मच्या पाठीमागे भाटघर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये असलेला धबधबा व बेबी पुल पाहण्यासाठी गेले होते. त्यांनतर वडील धरण्याच्या किना-या जवळुन न येता पाण्यात उतरले. त्यांची मुलगी ऐश्वर्या हि बेबी पुलाजवळ पाण्यात खेळत होती. तिला तिच्या वडीलांनी खोल पाण्यातजवळ बोलावून घेतले. त्यांनतर दोघे पाच ते सहा मिनिट खोल पाण्यात पोहत होते. दोघे पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु त्यांना बाहेर येता आले नाही. धरणाचे खोल पाण्यात ओढले गेल्याने व थोड्यावेळाने पाण्यात बुडाले. हि महिती सिमा फार्म हाऊस येथील लोकांना कळवल्यानंतर थोड्या वेळाने एका पोहणा-या मुलाने ऐश्वर्याला पाण्याबाहेर काढले. तेव्हा ती बेशुध्द अवस्थेत होती. तिला कारमधून उपजिल्हा रुग्णालय भोर येथे आणले. डॉक्टरांनी ऐश्वर्याला तपासुन तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच शिरीष धर्माधिकारी हे पाण्यात बुडाले होते. राञी उशिरा त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुढील तपास भोर पोलीस करीत आहेत.