चाकण (पुणे) : सासूने मुलीला जेवायला दिले नाही म्हणून सुनेनं चक्क सासूचा खून केल्याचं उघडकीस आलं आहे. सासूने घरात स्वयंपाक बनवला नाही त्यामुळे मुलीला जेवण मिळालं नाही. या कारणावरून सासू आणि सुनेत वाद झाला या वादातून ही घटना घडली. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून सुनेला अटक करण्यात आली आहे.
सुषमा अशोक मुळे (वय.७१ वर्षे, रा. पंचवटी सोसायटी, झित्राईमळा, चाकण) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सुवर्णा सागर मुळे (वय.३२ वर्षे ) हिला पोलिसांनी अटक केली आहे. उपनिरीक्षक विनोद सुभाष शेंडकर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू सुषमा आणि सून सुवर्णा यांच्यात वारंवार किरकोळ कारणावरून भांडण होत होती. गुरुवारी दुपारी सून सुवर्णा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी शेजारी गेली होती. सायंकाळी उशिरा ती घरी आली त्यावेळी तिची मुलगी रडत होती. मुलीला विचारणा केली असता आजीने भाकरी बनवून दिली नाही, फक्त भातच दिल्याचं सांगितले. यावरून सासू-सुनेमध्ये भांडण झाले.
दरम्यान सासू भाकरी करत असताना सुनेने तिला बाजूला सारले. यामध्ये दोघीमध्ये चांगलीच झटापट झाली. एकमेकींना खाली पाडले. राग अनावर झाल्याने सून सुवर्णा हिने घरातील नायलॉन दोरीने सासूचा मागून गळा आवळला. यामध्ये सासू सुषमा या बेशुद्ध पडल्या. त्यानंतर तिने पतीला सासू चक्कर येऊन पडल्याचे सांगितले.
मुलगा सागर हा कामावरुन घरी आल्यावर त्याने आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र आईचा मृत्यू झाला होता. चाकण पोलिसांना माहिती मिळताच रात्र गस्तीवरील उपनिरीक्षक शेंडकर व इतर रुग्णालयात आले. त्यांना संशय आल्याने त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी याबाबत तपास सुरु केला असता मयत महिलेचा मुलगा सागर याच्याकडे चौकशी केली. त्यानंतर सून सुवर्णा हिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. तिने सासूचा गळा आवळून खून केल्याची कबूली दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड पुढील तपास करत आहेत.