पुणे : महापालिकेत झाडण काम करणाऱ्या महिलेला आराेग्याचा प्रश्न निर्माण झाला हाेता, त्यामुळे त्रस्त महिलेने धाकटी सून आपला सांभाळ करेल या आशेने स्वत: स्वेच्छानिवृत्ती घेत अनुकंपा तत्त्वावर आपल्या सुनेला नाेकरी मिळवून दिली. सुनेने नाेकरी मिळवली खरी, पण सासूचा सांभाळ करण्याच्या अपेक्षेवर पाणी फिरवले. सुनेला नोकरी दिली अन् पश्चात्ताप करण्याची वेळ आली, अशी या महिलेची स्थिती झाली आहे.
तब्येत साथ देत नसल्याने स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या आणि त्या जागी सुनेला नाेकरी दिलेल्या; पण सून सांभाळ करत नसल्याने त्रस्त झालेल्या या महिलेने मदतीसाठी महापालिकेकडेच हात पसरले आहेत. सुनेला दरमहा ४२ हजार रुपये पगार असूनही, ती एक रुपयादेखील सासूला देत नाही. सांभाळदेखील करत नाही. या तक्रार अर्जावर आता महापालिका कारवाई करणार आहे.
महापालिकेच्या घाण भत्त्यात आज राेजी सुमारे साडेचार हजार कर्मचारी काम करत आहेत. घाण भत्त्यात म्हणजे झाडणकाम, कचरा उचलण्याचे काम असते. हे कर्मचारी अशिक्षित व मागास असल्याने त्यांच्या नोकरीला कायदेशीर संरक्षण देण्यात आलेले आहे. शासनाने गठित केलेल्या लाड पागे आयोगाच्या तरतुदीनुसार या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वारसाहक्क व अनुकंपाने त्यांच्या इच्छेनुसार नोकरी देता येते. त्याचा फायदा अनेक कर्मचारी व त्यांच्या वारसांना झाला आहे.
-------
नियम काय सांगताे?
ज्याला वारसाहक्काने नोकरी मिळाली आहे त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याचा त्याच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत सांभाळ करण्याचे हमीपत्र स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायचे असते. त्याचे तंताेतंत पालन करणे त्याच्यावर बंधनकारक असते. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्याची संपूर्ण जबाबदारी वारसदार म्हणून त्याच्या जागेवर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याची असते. परंतु यात टाळाटाळ होत असल्याचे प्रकार समोर येत असून अशा तक्रारी समाेर येत आहेत.
..............
निवृत्त कर्मचाऱ्यांचे होतात हाल :
ज्या कर्मचाऱ्यांना सेवेत २० वर्षे झाली, त्यांना पेन्शन लागू होते. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात ते त्यांच्या नात्यातील किंवा दत्तक घेतलेल्या व्यक्तीला वारसाने नोकरी देतात; पण सध्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत.
...........
कोट :
घाण भत्त्यात अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळालेले कर्मचारी निवृत्त कर्मचाऱ्यांचा सांभाळ करत नाहीत, आर्थिक मदत करत नाहीत; अशा कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखणे, नोकरीवरून कमी करणे अशी कारवाई केली जाऊ शकते. काही निवृत्त कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या वारसांबद्दल तक्रारी आल्या असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
- सचिन इथापे, उपायुक्त, सेवकवर्ग विभाग
----------
एक वेळ ताट द्यावे; पण पाट देऊ नये!
निवृत्त कर्मचारी असलेल्या या सासूची व्यथा पाहून ‘नटसम्राट’मध्ये कावेरी (सरकार) च्या तोंडी असणाऱ्या ‘एक वेळ समोरचे ताट द्यावे, पण बसायचा पाट देऊ नये. तुम्ही तर सर्वच देऊन बसलात’ या वाक्याची आठवण झाली आणि समाजातील वास्तव अधाेरेखित झाले.
----------