पुणे : ज्येष्ठ नागरिक असलेल्या सासू-सासऱ्यांच्याच बंगल्यामध्ये राहून त्यांनाच मानसिक, आर्थिक त्रास देणाऱ्या सुनेला न्यायालयाने दणका दिला आहे. सासू-सासऱ्यांच्या मालकीचे असणारे घर सुनेने पंधरा दिवसांत सोडावे, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. के. शेळके यांनी दिला आहे.
या प्रकरणातील सुनेने पती, सासू, सासरे, दीर, जावू यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दावा दाखल केला होता. या दाव्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने ऑगस्ट २०२२ मध्ये बंगल्यातील एक खोली सुनेला राहण्यासाठी द्यावी, असा आदेश दिला होता. हा बंगला सासू-सासऱ्यांच्या मालकीचा असून, महिलेचा पती अमेरिकेत नोकरीसाठी वास्तव्यास असल्याने बंगल्यात सासू-सासरे आणि सून असे तिघे राहत होते. ऑगस्ट २०२२ मध्ये न्यायालयाने आदेश देताना सासू-सासरे ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांना त्रास न देण्याचा आदेश सुनेला दिला होता. तरीदेखील सूनेने सासू-सासरे यांना शारीरिक आणि आर्थिक त्रास दिला. तसेच, घरात अशांतता ठेवणे, घरातील वस्तूंची तोडफोड केली.
सासू-सासरे हृदयविकाराचे रुग्ण असल्याने त्यांना सूनेकडून होणारा त्रास असह्य झाल्याने त्यांनी अॅड. सागर भोसले यांच्यामार्फत प्रथमवर्ग न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने ऑगस्ट २०२२ मध्ये सुनेला बंगल्यातील एक खोली देण्याचा आदेश मागे घेण्याची मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली होती. न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेत सुनेला पंधरा दिवसात बंगला खाली करण्याचा आदेश दिला.
२५ हजार रुपये भाडे द्यावे-
या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना पतीने संबंधित महिलेला भाड्याने घर देण्याचे ठरविले होते. त्यानुसार न्यायालयाने पत्नीला दरमहा २५ हजार रुपये भाडे द्यावे, असा आदेश पतीला दिला आहे.