बारामतीच्या सुनांनी घड्याळासमोरील बटण दाबून 'सून बाहेरची की घरची' हे दाखवून द्या - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 10:03 AM2024-04-29T10:03:04+5:302024-04-29T10:03:22+5:30
भावनिक मुद्द्याला बळी न पडता घड्याळाला मत द्या, विकास कामांना निधी देण्यास कुठेही कमी पडणार नाही
पुणे : बारामतीत लोकसभेत सुनेत्रा पवार यांच्याविरुद्ध सुप्रिया सुळे अशी नणंद भावजय अशी लक्षवेधी लढत होणार आहे. संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांमधून एकमेकांवर टीकाटिपणी होताना दिसत आहे. अशातच पत्रकाराशी संवाद साधताना मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे असे विधान करीत सुनेत्रा पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्या विधानावरून राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्या मुद्द्याला धरून बारामतीच्या सर्व सुनांनी आता घड्याळा समोरील बटण दाबून सुन बाहेरची असते का घरची हे दाखवून द्या असे अजित पवारांनी टिप्पणी केली आहे. सांगवी ( ता.बारामती) येथे बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभेत अजित पवार बोलत होते
कोणत्याही भावनिक मुद्द्याला बळी न पडता घड्याळाला मत देण्याचे आवाहन करत, राहिलेल्या विकास कामांना निधी देण्यास कुठेही कमी पडणार नसल्याचा शब्द यावेळी अजित पवारांनी मतदारांना दिला. यावेळी महायुती मित्र पक्षातील पदाधिकारी व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
या अगोदरही पवार कुटुंबात फूट पडली होती.....
पुढे अजित पवार म्हणाले, आमच्या कुटुंबात त्यावेळी वसंत पवारांसह संपूर्ण कुटुंब शेतकरी कामगार पक्षात होते. पवार साहेब कॉंग्रेसचे काम करायचे परंतु, सर्वांनी ते मान्य केलं,त्यामुळे पवार कुटुंबात राजकीय फुटीच्या घटना नवीन नसल्याचे अजित पवारांनी कुटुंबातील जुन्या राजकीय प्रसंग समोर मांडले. त्यामुळे आता शरद पवार यांच्यापासुन अजित पवार वेगळे झाल्यानंतर कुटुंबात झालेल्या दुफळीबाबत अजित पवारांवर होतं असलेल्या आरोपांना खोडत प्रश्न उपस्थित केला. यामुळे पवार कुटुंबात दुसऱ्यांदा फूट पडल्याचे यानिमित्ताने समोर आले आहॆ. पुढे पवार साहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना करे पर्यंत निवडणुकीचे मिळालेले एकूण सहा चिन्ह देखील अजित पवार सांगायला ते विसरले नाहीत. पवार कुटुंबाच्या उभ्या फुटी नंतर सध्याच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना मिळालेले सातवे चिन्ह तुतारी सांगायच्या अगोदरचं ते चिन्ह विसरून जा असे मिश्किल भाषेत सांगताच सभेत एकच हशा पिकाला.
भाजपने केलेल्या कामाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न.......
बारामतीचा भाग दुष्काळी आसताना देखील नीरा डाव्या कालव्याला पाणी आलं. यामुळे शेतकऱ्यांनी मतदान करताना कोणामुळे पाणी आलं कोणत्या सरकारने पाणी दिल हे विसरू नये. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी त्यांच्या विचारांचा खासदार म्हणजेचं सुनेत्रा पवारांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. पालखी महामार्ग,व फलटण -बारामती रस्ता भाजपने केला. पण श्रेय मात्र,शरद पवार गट लाटत असल्याचा आरोप यावेळी अजित पवारांनी केला.
माळेगाव कारखान्याचे २५ हजार कोटींचा टॅक्स माफ झाला.....
माळेगाव कारखान्याला १० हजार कोटींचा टॅक्स व १५ हजार कोटींचं व्याज लागलं होतं. अमित शहांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी संपूर्ण टॅक्स व व्याज माफ केलं. माळेगावने उसाला एफआरपी पेक्षा जास्त दर दिला. भाजप सरकार चांगले निर्णय घेत असून मोदींची प्रशासनावर चांगली पकड आहॆ,आपला फायदा होतं आहॆ. त्यामुळे मी भाजप सोबत गेलो असल्याचे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले.