पुणे : ‘माझ्या पाेरीची दाेन्ही फुप्फुसं काम करत नाहीत. सध्या ती ऑक्सिजनवर आहे. डाॅक्टर सांगताहेत, ब्रेन डेड झालेल्याचे फुप्फुसं बसवावे म्हणजे ‘लंग ट्रान्सप्लांट’ करावं लागले; पण त्यासाठी ४० ते ५० लाख रुपयांचा खर्च येताेय. तिच्या उपचारासाठी इतकी रक्कम उभारू कशी, गरीब बापाचा हा सवाल काळजाला चर्रऽ करणारा आहे.
सामान्य शेतकरी असलेले साताऱ्याचे नानासाहेब जाधव हे गेल्या सहा महिन्यांपासून मुलीला घेऊन ‘ससून’मध्ये आहेत. त्यांची आर्त हाक ऐकून अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. जाधव म्हणाले की, ‘मी शेतकरी माणूस. घरी जमीन एक एकर आणि खाणारी ताेंड सहा; पण पाेरीच्या वेदना पाहावत नाहीत. तिच्या उपचारासाठी इतकी रक्कम कशी उभी करायची, या प्रश्नाने व्यथित झालाे आहे.’
नानासाहेब यांची २७ वर्षांची मुलगी नीलम गेल्या सहा महिन्यांपासून ‘ससून’मधील श्वसनराेग विभागात उपचार घेत आहे. सुरुवातीला व्हेंटिलेटर आणि आता ऑक्सिजनवर आहे. तिच्यासाठी नानासाहेब इतके दिवस घरीही जाऊ शकले नाहीत. कारण, नीलम ही ऑक्सिजनशिवाय एक मिनीटही श्वास घेऊ शकत नाही. बेडवर असाे की बाथरुम सर्व ठिकाणी तिला ऑक्सिजन लावलेला ठेवावा लागताे. त्यातच तिला सारखा खाेकलाही लागताे. परंतु, नानासाहेब जाधव हे धीर न साेडता पाेटच्या मुलीसाठी धडपडत आहेत. त्यांचा माेठा मुलगा पुण्यात एका संस्थेत काम करताे. त्याच्यावरच कुटुंबाचा खर्च आणि औषधाेपचाराची जबाबदारी आहे.
नानासाहेब जाधव हे मूळचे ढाेकळवाडी (ता. खटाव, जि. सातारा) गावचे. दुष्काळी पट्ट्यात राहणारे. त्यांना तीन मुलं. माेठा मुलगा शरद, त्यानंतर नीलम व पल्लवी. शेतीकाम करून आणि घरच्या एक एकर शेतीत कसून त्यांनी दाेन्ही मुलींचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले. नीलमचे २०२१ मध्ये लग्नही लावून दिले. परंतु, सासरच्या पैशांच्या छळाला कंटाळून तिने फेब्रुवारी २०२२ला विष पिले. याप्रकरणी त्यांनी पाेलिसांत तक्रारही केली आहे. सुरुवातीला तिच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयांत उपचार केले. त्यानंतर तिला ससूनला आणले. गेल्या सहा महिन्यांपासून ती ससूनमध्ये नवीन इमारतीच्या श्वसनराेग विभागात उपचार घेत आहे. तिच्या साेबत तिची लहान बहीण पल्लवीदेखील असते.
नीलमचे वजन ५५ वरून आले ३२ वर :
नीलमचे वजन आधी ५५ किलाे हाेते. आजारपणामुळे ती आता थेट ३२ किलाेवर आली आहे. ऑक्सिजन लावूनही तिला धाप लागते, बाेलताना दम लागताे आणि खाेकल्याची उबळही येते. मात्र, तिची जगण्याची आणि बरी हाेण्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे. तिची फुप्फुस प्रत्याराेपण करण्याची तयारी आहे.
अजितदादांनीही दिले आश्वासन :
ससून रुग्णालयातील जुन्या इमारतींची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दाेन दिवसांपूर्वीच रुग्णालयात आले हाेते. त्यावेळी दिलशाद अत्तार या समाजसेविकेने त्यांच्याशी जाधव यांची भेट घडवून आणली. त्यावर पवार यांनी मुंबईतील एका खासगी हाॅस्पिटलमधून हे प्रत्याराेपण करण्याबाबत त्यांना आश्वासन दिले आहे.
मी ससूनमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून आहे. हाॅस्पिटल किंवा सामाजिक संस्थांनी दिलेल्या अन्नाच्या माध्यमातून राहावे लागते. नीलमची सध्याची स्थिती पाहावत नाही. आम्ही तिच्या फुप्फुस प्रत्याराेपणाची पुण्यातील व मुंबईतील फाेर्टीस हाॅस्पिटल येथे चाैकशी केली असता त्यासाठी ४० ते ५० लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले. परंतु, आमची इतकी ऐपत नाही. तरी काेणी संस्था, दानशूर व्यक्ती यांनी मदत केल्यास नीलमचा उपचार शक्य हाेऊन मला आधार हाेईल.
-नानासाहेब जाधव, नीलमचे वडील
नीलमचे दाेन्ही फुप्फुस निकामी झालेले आहेत. तिला आम्ही शक्यताे सर्व मदत करत आहाेत. सध्या ऑक्सिजन सुरू आहे. फुप्फुस प्रत्याराेपण सुविधा ससूनमध्ये नाही. त्यांना लागणारी सर्व वैद्यकीय मदत आमची डाॅक्टरांची टीम करत आहे.
-डाॅ. संजय गायकवाड, विभागप्रमुख, श्वसनराेग विभाग