काटेवाडी : भवानीनगर (ता. इंदापूर) परिसरातील भाग्यनगर येथील मायलेकींनी चक्क एकत्र दहावीची परीक्षा देऊन यश संपादन केले आहे. शिक्षणाला वयाचे बंधन नसते, हे मायलेकींनी दाखवून दिले आहे. या यशाने परिसरात वेगळा आदर्श निर्माण केला आहे.प्रतिकूल परिस्थितीत मशीन शिलाईकाम करून सुवर्णा पोपट अंकुशे-पवार यांनी वयाच्या ३४व्या वर्षी १७ नंबर फॉर्म भरून यश मिळविले आहे. त्यांची मुलगी मोहिनी हिनेही दहावी परीक्षेत ८० टक्के गुण मिळवून यश मिळवले आहे. या यशाने कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला आहे. मायलेकीने एकमेकींना पेढा भरवून आनंद साजरा केला. सुवर्णा यांना ५१.१२ टक्के गुण मिळाले आहेत.प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना लहान वयात लग्न झाल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते; मात्र त्याची सल मनात कायम सलत होती. आपल्या वाट्याला आले ते मुलींच्या वाट्याला येऊ नये, यासाठी मुलींना शिक्षण द्यायचे, ही मनाशी खूणगाठ बांधली होती. यासाठी शिलाईकाम करून मुलीचे शिक्षण सुरू होते. तब्बल १८ वर्षांनी अर्धवट राहिलेले शिक्षण घेण्यासाठी मनाची घालमेल सुरू होती. मनाची घालमेल मुलींनी ओळखून दहावीच्या परीक्षेसाठी १७ नंबर फॉर्म भरून दहावी परीक्षा देण्यासाठी प्रवृत्त केले.मुुलीसमवेत दहावीच्या परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी केली. मुलगीच अभ्यास घेत असल्यामुळे उत्साह वाढला. त्यामुळे शिलाईकाम व रात्री अभ्यास चालू ठेवला. मुलींनीही मला यासाठी मदत केली. दहावीनंतरही पुढे शिक्षण घेणार असल्याचे अंकुशे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
‘मायलेकी’ एकाच वेळी दहावी उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 2:04 AM