मनोहर बोडखे
दौंड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाल्यामुळे विद्यमान भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्या राजकीय दृष्टिकोनातून अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, सध्याच्या परिस्थितीतील बदलत्या राजकारणाचा फटका विधानसभा निवडणुकीत नेमका कोणाला बसतो हे गुलदस्त्यात आहे. मात्र आता राज्याला मिळालेल्या दोन उपमुख्यमंत्र्यांमुळे दौंड तालुक्यातील गटातटाच्या राजकारणावर याचा परिणाम होण्यास सुरुवात होईल. त्यानुसार रमेश थोरात गटाची ताकद वाढेल ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.
परिणामी राजकीय दृष्ट्या कुल - थोरात दोन्ही गटाचे तालुक्यात विविध शासकीय कार्यालयात वर्चस्व राहील. तर शरद पवार यांचा गट सत्तेत नसला तरी त्यांची ताकद कमी लेखून चालणार नाही. भविष्यात अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यात शंका नाही कदाचित राज्याचे मुख्यमंत्री देखील असू शकतील असेही राजकीय दृष्ट्या बोलले जाते. मात्र याचा फायदा थोरात गटाला होईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तालुक्यात त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांना पाठबळ दिल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यानुसार माजी आमदार रमेश थोरात, दौंड शुगरचे ज्येष्ठ संचालक वीरधवल जगदाळे, महानंदाच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे यांची ताकद अजित पवारांच्या माध्यमातून वाढणार आहे. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेतून बंड पुकारल्यावर सत्तांतर झाले या सत्तांतरात देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील आमदार राहुल कुल आहेत. त्यानुसार गेल्या वर्षभरा पासून जिल्ह्यात आमदार राहुल कुल यांचे वर्चस्व आहे. परिणामी सत्तेअभावे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात शांततेचे वातावरण होते. एकंदरीतच भाजप आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांचे राहुल कुल यांच्या माध्यमातून कामे मार्गी लागत असल्याने. भाजपाच्या गोटात सर्व काही अलबेल आहे.
कारण सध्याच्या परिस्थितीत सर्व शासकीय कार्यालयात राहुल कुल यांचा दबदबा आहे. मात्र असाच दबदबा आता माजी आमदार रमेश थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा राहणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना ( शिंदे गट ), राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) यास अन्य मित्र पक्षांची युती झाली. तर दौंड विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला आहे अजित पवार यांचे जिल्ह्यातील वर्चस्व पाहता दौंड विधानसभा मतदारसंघाची अदलाबदल होऊ शकते. परिणामी राजकीय दृष्ट्या राहुल कुल यांना अडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या दुफळीचा फटका रमेश थोरात यांना बसू शकतो. येणाऱ्या विधानसभेला राष्ट्रवादी(अजित पवार ) दौंड विधानसभेची उमेदवारी कोणाला देईल हे सांगता येत नसले तरी भाजपाच्या माध्यमातून राहुल कुल यांची उमेदवारी मात्र निश्चित राहील. तरी देखील भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशअध्यक्ष हे देखील उमेदवारीसाठी प्रयत्नशील राहतील.
ज्याप्रमाणे राष्ट्रवादीत अडचणी निर्माण झाल्या. अशाच अडचणी भाजपात निर्माण होण्याच्या दाट शक्यता आहे.राजकीय पक्षा व्यतिरिक्त कुल आणि थोरात यांची वैयक्तिक ताकद आहे .तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार त्यांचे सहकारी राष्ट्रवादीच्या ( शरद पवार गटात ) सहभागी झाले आहे. हा गट देखील शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून. आवाहन उभे करू शकतो हे नाकारून चालणार नाही कारण दौंड तालुक्यात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे शरद पवार तालुक्याच्या राजकारणात अडचण निर्माण करू शकतील अशी एकंदरीत परिस्थिती राहील.