पुणे : मागील सात महिन्यांपासून प्रवाशांसाठी बंद असलेली दौंड डेमु गाडी मंगळवार (दि. २०) पासून धावणार असल्याचे पोलिस व रेल्वे प्रशासनाकडूनही जाहीर करण्यात आले होते. पण काही तांत्रिक अडचणींमुळे ही गाडी रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांची निराशा झाली आहे.लोणावळा लोकल सुरू झाल्यानंतर दौंड डेमु सुरू करण्याची मागणी होत होती. पोलिस आयुक्तांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर या गाडीला हिरवा कंदील मिळाला. याबाबत पोलिसांकडून दि. २० तारखेपासून डेमु धावणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तर रेल्वेकडून सोमवारी सायंकाळी या गाडीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. त्यानुसार पुणे व दौंडमधुन सकाळी व सायंकाळी अशा एकुण चार फेºया होणार होत्या. गाडीमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील ई-पास असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जाणार असल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले होते.
मात्र, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी रात्री उशिरा ही गाडी रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. काही तांत्रिक कारणांमुळे मंगळवारपासून डेमु धावणार नाही. ही गाडी कधी सुरू होणार याबाबत नंतर कळविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.-------------