यवत : दौंड, शिरूर व बारामती या तालुक्यांत हायड्रोकार्बनचे साठे आहेत का? याचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म शाखेकडून तिन्ही तालुक्यांतील तहसीलदारांना लेखी पत्र देऊन या ठिकाणी काम करणाऱ्या एजन्सीलासहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दौंड तालुक्यातील भांडगाव व खोर गावाच्या शिवारात अनेक ट्रॅक्टर व इतर यांत्रिक साधनांद्वारे जमिनीत विंधन विहिरी घेऊन या साठ्यांचा शोध घेतला जात असल्याने त्याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, हे काम सुरू करण्यासाठी शासकीय परवानगी घेण्यात आल्याचे समोर आले आहे. संबंधित काम कोणा शेतकºयाचे अथवा खासगी कंपनीचे नसून देशाच्या गाळयुक्त खोºयात हायड्रोकार्बनचे साठे असल्याची दाट शक्यता गृहीत धरून त्याची प्राथमिक पडताळणी सुरू आहे. त्यामुळे दौंड तालुक्याच्या शिवारात भविष्यात हायड्रोकार्बनचे साठे सापडलेच, तर आश्चर्य वाटायला नको.भांडगाव परिसरात विविध ठिकाणी ट्रॅक्टरला जोडलेल्या छोट्या बोरवेल मशिनच्या साह्याने जमिनीत होल मारण्याचे काम सुरू असल्याने लोकांची उत्सुकता वाढीस लागली आहे. भांडगावचे उपसरपंच रवींद्र दोरगे यांनी याबाबत विचारणा केली असता आॅईल अँड नॅचरल गॅस कंपनी या शासनाच्या उपक्रमाकडे हे काम सोपविण्यात आले आहे. ओएनजीसी हे काम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर याबाबत सेवा पुरवणाºया कंपनीकडून हे काम करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने दौंड, शिरूर व बारामतीच्या तहसील कार्यालयांना संबंधित यंत्रणेला मदत करण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत. तालुक्यांच्या तहसीलदार कार्यलयांकडून संबंधित विभागाचे मंडलाधिकारी व गावकामगार तलाठी यांना याबाबत सूचित करण्यात आले आहे.हायड्रोकार्बन हा घटक हायड्रोजन व कार्बन यांच्या संयुगातून तयार होतो. खनिज तेल व नैसर्गिक वायूमध्ये हायड्रोकार्बन आढळून येतो. जिल्ह्याच्या गाळयुक्त खोºयात हायड्रोकार्बन अर्थात खनिज तेल अथवा नैसर्गिक वायूचे साठे असण्याची शक्यता गृहीत धरून हे परीक्षण सध्या सुरू आहे.यामध्ये तथ्य आढळल्यास भविष्यात हायड्रोकार्बनच्या शोधासाठी प्रयत्न होऊ शकतात. या कामात कोणी अडथळा आणू नये, यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून काळजी घेण्यात आली आहे. वन विभागानेही या यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी सूचित करण्यात आले आहे.
दौंड, शिरूर, बारामतीत हायड्रोकार्बनचे साठे?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 12:46 AM