दौंड शुगर्स आणि अंबालिका कारखान्यांमुळे शेतकऱ्यांचे प्रपंच फुलले- दत्तात्रय भरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 07:46 PM2021-10-09T19:46:35+5:302021-10-09T19:59:06+5:30
यावेळी भरणे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचे हित साधणाऱ्या कारखान्यांकडून चुकीच्या गोष्टी कदापी होणार नाहीत (it raid in pune, pune it raid, ajit pawar, income tax raid in pune)
इंदापूर (पुणे): राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी इंदापूर तालुक्यासह व इतर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी दौंड शुगर, अंबालिका यासारख्या साखर कारखान्याची निर्मिती केली. इतर कारखांन्यापेक्षा प्रतिटनाला चारशे-पाचशे रुपये दर अधिकचा देऊन, शेतकऱ्यांचे प्रपंच चांगले फुलवण्याचे काम केले, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (dattatray bharne) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थन केले.
इंदापूर येथे शनिवारी ( दि. ९ ) आयोजित पत्रकार परिषदेत भरणे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भरणे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचे हित साधणाऱ्या कारखान्यांकडून चुकीच्या गोष्टी कदापी होणार नाहीत. इंदापूर सहकारी साखर कारखाना व दौंड तालुक्यातील सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना काय दर देतो, अजित पवार यांचे कारखाने काय दर देतात, हे तमाम शेतकरी बंधूंना माहिती असल्याचे भरणे यावेळी म्हणाले.
पवार कुटुंबियांची बदनामी कधीही चुकीच्या पद्धतीने होऊ शकत नाही. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या हितासाठी हे कुटुंब अहोरात्र वेळ खर्च करते. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आखलेल्या धोरणामुळे सुखी होत आहे. दौंड शुगर, अंबालिका या साखर कारखान्यांचा अतिरिक्त उसाचा प्रश्न मिटविण्यासाठी महत्वाची भूमिका आहे. याचा विचार सर्व स्तरातून होणे गरजेचे असल्याचे भरणे म्हणाले.
तालुक्यातील जनतेच्या आरोग्यविषयक बोलताना राज्यमंत्री भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य रुग्णांना मोफत उपचार मिळण्यासाठी आपण स्वत: यंत्रणा तयार केली आहे. ती टीम मुंबईमध्ये २४ तास कार्यरत आहे. शासनाकडून मिळणारा आरोग्याचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असेही आवाहन यावेळी भरणे यांनी केले.