पुणे : रिमझिमणाऱ्या पावसासोबत घाटातली वाट तुडवत विठूनामाचा जयघोष करून वारकरी पंढरीकडे प्रवास करत आहेत. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवात जात, धर्म, पंथ असा कोणताही भेद नाही.सर्व जाती धर्माचे लोक स्वतःला विसरून आणि एकमेकांत असलेल्या माऊली''चा आदर करून वारी करत असतात. या प्रवासात पाळल्या जाणाऱ्या परंपरा, रिंगण यांची ओळख दरवर्षी महाराष्ट्राला करून दिली जाते.
या वारीत परंपरा नसली तरी आवर्जून पाळली जाणारी सवय म्हणजे दौडज खिंडीत धुतली जाणारी वस्त्रे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीला आळंदीला सुरुवात होते तेव्हा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झालेली असते आणि जसजशी पालखी पुढे पुढे जाते तसतसा पावसाचा जोर वाढतो आणि आषाढीपर्यंत पेरण्याही उरकलेल्या असतात. त्यामुळे पावसाच्या सोबतीने चिखलाची वाट तुडवतच दरवर्षी वारी केली जाते ज्याची वारकऱ्यांना सवय आहे. अशावेळी काही अडचणींना त्यांना तोंड दयावे लागते त्यातली महत्वाची अडचण म्हणजे कपडे वाळवण्याची. ही परिस्थिती लक्षात घेवून जेजुरी मुक्काम उरकून पालखी वाल्हे मुक्कामाला निघाली की वाटेतल्या दौंडज खिंडीतल्या भणाणत्या वाऱ्याचा आणि विस्तीर्ण जागेचा उपयोग केला जातो. प्रत्येक ठिकाणी ठराविक काळ असलेली विश्रांती, सकाळी लवकर होणारे प्रस्थान आणि कमीवेळा होणारे सूर्यदर्शन यामुळे कपडे वाळायला अडचण होते. अशावेळी खिंडीतल्या भल्या थोरल्या डोंगरावर कपडे धुवून सुकवण्याचे काम अनेकजण उरकून घेतात. या कपड्यांमुळे हा संपूर्ण डोंगर रंगीबेरंगी दिसत असतो. कमीतकमी साधनांमध्ये आणि आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा वारकऱ्यांचा साधेपणा या वस्त्र ल्यालेल्या डोंगराकडे बघून पटतो.