दौंड: दौंड तालुक्यात महायुतीचा धर्म पाळून एकमेकाला धक्का लागू न देता समाजकारण आणि राजकारण केले जाईल, असे मत आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले. दौंड येथील विजयी सभेत ते बोलत होते. दरम्यान, तालुक्यातील सर्व जनतेचे मी आभार मानतो. मला तिसऱ्यांदा निवडून दिल्याबद्दल, माझ्या निवडणुकीत मतदारांसह सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले यात दुमत नाही. परंतु, महायुतीतील पक्षांची व्याप्ती वाढली त्यानुसार पदांची देखील व्याप्ती वाढली जाणार आहे. तेव्हा सर्व काही माझ्यासाठी असं न करता महायुतीतील सर्व घटक पक्षांना या पदांमध्ये सामावून घेतले जाईल.
दहा वर्षांत केलेली विकासकामे माझ्या विजयासाठी कामास आले आहे, परंतु भविष्यात तालुक्यात शैक्षणिक संकुल आणि औद्योगिक वसाहत सुरू करेल, तसेच वीज, पाणी, रस्ते यास अन्य काही विकासकामे मार्गी लागलेले असतील किंबहुना या जोरावर पुन्हा २०२९ च्या निवडणुकीला सामोरे जाईल. माझ्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन विरोधकांनी आरोप केले, मात्र मी कुणावरही टीका करीत नव्हतो कारण माझी विकासकामे आणि आरोग्याची सेवा माझ्या कामास येत होती आणि याची पावती मला जनतेने दिली. भविष्यात सर्वसामान्य मनुष्य केंद्रबिंदू मानून कामकाज केले जाईल असे शेवटी राहुल कुल म्हणाले. यावेळी भाजपाचे पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे, दौंड शुगरचे ज्येष्ठ संचालक वीरधवल जगदाळे, सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेश भागवत, माजी नगराध्यक्ष, इंद्रजित जगदाळे, माजी नगरसेवक नंदू पवार, उद्योगपती विकास ताकवणे यांनी मनोगत व्यक्त केले. ॲड. बापूसाहेब भागवत यांनी सूत्रसंचालन केले.
आमच्यावर अजित पवारांचा पगडा
विजयी सभेत जाहीर भाषणात दौंड शुगरचे ज्येष्ठ संचालक वीरधवल जगदाळे म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष राहुल कुल यांचे काम करतील की नाही असे काही मंडळींना वाटत होते, परंतु आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वभावानुसार हा तर हा नाही तर नाही ही संकल्पना राबवून आम्ही पूर्ण ताकतीने राहुल कुल यांचे काम केले. माझ्यासह वैशाली नागवडे, महेश भागवत, गुरुमुख नारंग, विकास खळदकर, तसेच कार्यकर्त्यांनी अजितदादांचा शब्द प्रमाणीत धरून कामकाज केल्याने याचे फलित विजयातून दिसून आले. असे शेवटी वीरधवल जगदाळे म्हणाले.