पुणे : भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या दौंड तालुक्यातील भीमा पाटस साखर कारखान्याने पुणे जिल्हा बँकेचे तब्बल दीडशे कोटी रुपयांचे कर्ज थकवले आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे कर्ज परतफेड करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पण आता तीन वर्षांपासून साखर कारखाना बंद असून, सुरू होण्याची काहीच लक्षणे दिसत नाही. यामुळेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दीडशे कोटी थकबाकी वसुलीसाठी भीमा पाटस साखर कारखान्यावर जप्तीची नोटीस दिली आहे. थकीत कर्ज परतफेड त्वरीत न केल्यास कारखाना बँक ताब्यात घेईल अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी दिली. या कारवाईमुळे दौंड तालुक्यातील राजकारण पुन्हा पेटणार असल्याचे स्पष्ट झाले.
दौंड तालुक्यातील भीमा पाटस साखर कारखान्याच्या बोगस कारभाराची माहिती देण्यासाठी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा तथा दौंड तालुक्यातील नेत्या वैशाली नागवडे उपस्थित होत्या. यावेळी थोरात यांनी सांगितले की, सन २०१७ - २०१८ पासून भीमा पाटस साखर कारखाना बंद आहे. त्यापर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी तब्बल ३६ कोटी रुपयांची मदत करण्यात आली. परंतु शासनाची मदत मिळवून देखील कारखान्याचे नेतृत्व करणारे आमदार राहुल कुल कारखाना सुरू करू शकले नाही.
एकाच ट्रॅक्टरवर पाच बँकांकडून कर्ज
भीम पाटस साखर कारखान्याने सभासदांसह कर्ज पुरवठा करणा-या बँकांची देखील फसवणूक केली आहे. कायदेशीर थकहमी देत एकाच ट्रॅक्टरवर तब्बल पाच-पाच बँकांकडून कर्ज घेतले आहे. कारखान्याच्या गळीत हंगामासाठी ७०० ट्रॅक्टरवर प्रत्येकी ४० लाख प्रमाणे १२७ कोटींचे कर्ज घेतले आहे. केल्या दोन व तीन वर्षांपासून हे कर्ज देखील धकीत आहे.
नुसत्याच गप्पा नको कारखाना सुरू करून दाखवा
दौंडचे आमदार व भीमा पाटस साखर कारखान्याचे अध्यक्ष यांनी नुसत्या गप्पा न मारता हजोरो शेतकरी व सभासदाचे हित लक्षात घेऊन साखर कारकाना सुरू करू दाखवावा. कुल यांच्या बोगस कारभारामुळे कामगार, शेतकरी, ग्राहक अडचणीत आले आहेत. याबाबत कारखान्याच्या कारभाराची चौकशी करण्याची लेखी मागणी सहकार आयुक्त यांच्याकडे केली आहे.