लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत स्टार्टअपच्या माध्यमातून दौंड तालुक्यातील मौजे पडवी येथील अक्षय गायकवाड या अभियंत्याने आपल्या कंपनीच्या माध्यमातून अत्यंत शास्त्रशुद्ध पध्दतीने रसायनविरहित उभारलेल्या गूळ उत्पादन कारखान्यातून विविध फ्लेवर्डच्या गूळ पावडरीचे उत्पादन करीत आहेत. अन्न प्रशासन, उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळांच्या माध्यमातून परीक्षण करून निर्यातीसाठीचे मानांकने/निकष पूर्ण केले. त्यानंतर बुधवार (दि.२४) रोजी ॲग्रिकल्चर आणि प्रोरोस्ड फूड प्रोडक्ट एस्कपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटीचे (अपेडा) राधिव डॉ. सुधांशू यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून चार मेट्रिक टनाचा फ्लेवर्ड गुळाच्या पावडरचा पहिला कंटेनर नवी मुंबईच्या तुर्भे येथून अमेरिकेला रवाना झाला.
कृषी विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजने अंतर्गत या प्रकल्पास अर्थसाहाय्य केले. तसेच या प्रकल्पात आलेल्या विविध अडचणी नोडल अधिकारी कृषी उपसंचालक विजय कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोडविल्या. विक्री व्यवस्थापनाबाबत पुणे व मुंबईसारख्या महानगरात गूळ उत्पादने कशी विकली जातील यासाठी वेगवेगळ्या विक्रेत्यांबरोबर ओळखी व बैठका पार पाडण्यास मदत झाली. त्याबरोबरच अपेडाचे असिस्टंट जनरल मॅनेजर प्रशांत वाघमारे यांचेशी समोरासमोर ओळख करून दिल्यामुळे गूळ उत्पादनाच्या निर्यातीचा निर्धार केला व त्या दृष्टीने उत्पादन चालू केल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
प्रक्रिया उद्योगांच्या अनुषंगाने केंद्र व राज्यशासनाच्या विविध योजनांतून अत्यंत सूत्रबद्ध पध्दतीने उद्योजक तयार करण्याचे काम शासनाचा कृषी विभाग करीत असून, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेचा (पीएमएफएमई) लाभ घेणेसाठी जास्तीत जास्त पुढे यावे, असे आवाहन जिल्ह्याचे अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले.
फोटो -