दावडी: एसटी महामंडळाच्या परवान्याच्या पावत्यांचा आधार घेत एका व्यावसायिकाने दावडी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीची जागा बळकावली आहे. संबंधित जागा ही एसटी महामंडळाची असून, मी त्याचे रितसर भाडे भरत आहे. ग्रामपंचायतीचा व या जागेचा कोणताही संबंध नाही, अशी भाषा वापरून बसथांबालगतचे ग्रामपंचायतीचे दोन गाळे ताब्यात घेऊन संबंधित चालकाने त्या ठिकाणी हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील दावडी येथे अनेक वर्षांपासून एसटीचे प्रतीक्षालय (बसथांबा) आहे. हा बसथांबा करण्यासाठी ग्रामपंचायतीने पूर्वी जागा दिली होती. दरम्यान, ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी बाजारगाळे बांधले. त्यातील एक गाळा बसथांबा व प्रवाशांना बसण्यासाठी चहा दुकानासाठी देण्यात आला. जुन्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. सध्या या परिसरात वर्दळ व रहदारी वाढल्याने बाजार गाळ्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. बसथांब्याच्या गाळ्याला लोखंडी शटर लावून त्या ठिकाणी हॉटेल व्यवसाय सुरू केला. सदर ठिकाणी एसटी बस थांबत नाही, तसेच प्रवाशांना हॉटेल चालक बसू देत नाही. महामंडाळला बसथांब्याची जागा यांचे भाडे मिळते. मात्र, ग्रामपंचायतीला तोटा होत आहे. अनेक वेळा तक्रारी करून हॉटेल चालक या ग्रामस्थांना दाद देत नाही. ग्रामपंचायतीला गाळ्याचे भाडे मिळत नसल्याने ग्रामपंचायतीचा महसूल बुडत आहे. तसेच या ठिकाणी ना एसटी बस थांबते, ना प्रवासी महामंडळाने या हॉटेल चालकावरती महामंडळ ग्रामपंचायतीची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करून बसथांब्याची जागा खाली करावी, अशी मागणी दावडीचे सरपंच संभाजी घारे, उपसरपंच राहुल कदम माजी उपसरपंच हिरामण खेसे, पोलीस पाटील आत्माराम डुंबरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष सातपुते, अनिल नेटके, रोहिदास आमराळे, काळुराम शिंदे, प्रसाद डुंबरे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून बसथांब्याच्या नावाखाली ग्रामपंचायतीचे दोन गाळे ताब्यात घेतले. या गाळ्याचे भाडे संबंधित व्यक्तीने ग्रामपंचायतीला अदा करावे, अन्यथा ग्रामपंचायतीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणार आहे.
संभाजी घारे (सरपंच दावडी )
दावडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार या बसथांब्याची राजगुरूनगर आगारातील कर्मचाऱ्यानी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आहे. या संबंधित परवानाधारकाला समज दिली आहे. मात्र, याबाबत कारवाई करण्याचे अधिकार नसल्यामुळे वरिष्ठाकडे पत्रव्यवहार करणार आहे.
शिवकन्या थोरात (आगार व्यवस्थापक, राजगुरुनगर )
दावडी (ता. खेड ) येथील बसथांबा.