भोर : तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भोर शहरातील बसस्थानक व आजूबाजूच्या रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले असूनरस्त्यांची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण बसस्थानकच खड्ड्यात गेले आहे. याचा त्रास प्रवासी, नागरिक व विद्यार्थ्यांना होत आहे. त्वरित खड्डे बुजवण्याची मागणी होत आहे.
बसस्थानक परिसरात अंर्तगत रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पाणी साचत आहे. अचानक एखादी बस आल्यास पाणी अंगावर उडू नये म्हणून प्रवाशांची मोठी धावपळ होत आहे. या धावपळीत एखादा अपघात होण्याची भीती आहे. बाहेरील रस्त्याला गुडघाभर खड्डे पडले आहेत. सदर खड्ड्यात पाणी साचल्याने अंदाज येत नसल्यामुळे दुचाकी, चारचाकी गाड्या अपटून अपघात घडत आहेत. दररोज साधारणपणे ३ ते ४ हजार विद्यार्थी व १० हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र, संपूर्ण बसस्थानकावर सर्वत्र दलदल झाली असून पाणी साचत आहे. घाण पसरली असून दुर्गंधी येत आहे. यातच प्रवाशांना दिवसभर एसटीची वाट पाहत बसावे लागत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नव्यानेच झालेल्या बसस्थानकाची अशी अवस्था झाल्याने संताप व्यक्त होत आहे.