बारामती : साठवण तलावाचे काम रेंगाळल्यामुळे बारामतीत ऐन सणाच्या काळात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. कमी पडलेला पाऊस, लांबलेल्या आवर्तनामुळे पाण्याचे नियोजन करावे लागत आहे. तसे नगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परंतु, मागील तीन वर्षांपासून साठवण तलावाचे काम रेंगाळत चालले आहे. बारामती नगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पहिल्या साठवण तलावाचे काम देण्यात आले. या साठवण तलावाला वर्षभरातच मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. दररोज दोन ते अडीच लाख लिटर पाणी वाहून जाऊ लागले. गळती काढण्यासाठी अगोदर बांधलेल्या सिमेंटच्या साठवण तलावातील पाणी उपसा करावा लागला. त्यानंतर गळती थांबविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तलावाचा तळ काँक्रीट मजबूत नसल्यामुळे गळतीचे प्रमाण कमी झाले नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून १२८ दशलक्ष लिटर क्षमतेचा साठवण तलाव बांधण्यात आला. त्यानंतर वर्षभरातच या तलावाला गळती लागली. पाणीपुरवठा विभागाने मोटारी लावून वाहून जाणारे पाणी पुन्हा तलावात सोडण्याचे काम ७ ते ८ महिने केले. सातत्याने जीवन प्राधिकरणाकडे पाठपुरावा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी केली. तलावातील पाण्याचा उपसा केला. लाखो लिटर पाणी वाया गेले. आता ऐन सणाच्या काळात पाण्याची टंचाई जाणवत आहे. ज्या ठेकेदाराने पहिल्या साठवण तलावाचे काम केले आहे, त्यालाच ३५५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाणी साठवण तलावाचे काम तीन वर्षांपूर्वी देण्यात आले आहे. कामाचा वेग सुरुवातीपासूनच मंदावला आहे. दरम्यानच्या काळात पाणीटंचाई असल्याने तसेच, अगोदर बांधलेल्या तलावातील पाण्याची गळती होत असल्यामुळे केलेल्या खोदकामातच कालव्याचे पाणी अडविण्यात आले. त्यामुळे काम थांबले. त्यानंतर अगोदरच्या सिमेंट तलावाची गळती काढण्यासाठी पाण्याचा उपसा केला. त्यामुळे काम सुरू असलेल्या तलावात पुन्हा कालव्याचे पाणी साठविण्यात आले. आता तलावात सतत पाणी असल्याची ओरड ठेकेदाराकडून होत आहे. त्यामुळे साठवण तलावाचे काम पूर्ण होत नाही. तलाव रिकामा करून दिल्यास लवकरच काम पूर्ण होईल, असे त्यांच्याकडून सांगितले जाते. वास्तविक, या कामाला तीन वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली आहे. ठेकेदाराने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे केलेल्या मागणीप्रमाणे वाढीव निधीलादेखील नगरपालिकेने मंजुरी दिली आहे. तरीदेखील काम रखडले आहे. (प्रतिनिधी)
नियोजनाअभावी दिवसाआड पाणी
By admin | Published: October 14, 2015 3:32 AM