येरवडा : इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त "ईद-ए-मिलाद" (Eid-e-Milad) च्या दिवशी संपूर्ण राज्यात ड्रायडे घोषित करावा. अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा (bjp) अल्पसंख्यांक मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष अन्वर पठाण यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या महत्त्वपूर्ण मागणीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) तसेच पुणे शहरातील सर्व आमदार, खासदार, उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्यासह महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या समवेत चर्चा करून हे निवेदन देण्यात आलेले आहे. तसेच या विषयावर तात्काळ कारवाई करावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उत्पादन शुल्क मंत्री यांना देखील निवेदन पाठविण्यात आलेले आहे.
इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर हे अल्लाह चे अंतिम प्रेषित आहेत. पवित्र कुराण ग्रंथामध्ये दारूला वर्ज्य घोषित करण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांच्या जयंतीच्या दिवशी ईद-ए-मिलादला संपूर्ण राज्यात दारू विक्रीवर राज्य शासनाच्या वतीने पूर्णपणे बंदी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. यावेळी भाजपा अल्पसंख्यांक विभागाचे पुणे शहराध्यक्ष अन्वर पठाण, मुस्तफाभाई पटेल, सरचिटणीस जावेद शेख, महिला उपाध्यक्ष जरीना शेख, अमरीन शेख, कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष सलीम शेख, पुणे शहर चिटणीस मन्सूर शेख यांच्यासह अल्पसंख्यांक मोर्चा चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.