खोडद : नात्यात, प्रेमात, आयुष्यात आणि समाजात गोडवा निर्माण करणारा आणि वाढविणारा सण म्हणजे मकरसंक्रांत. आज या मकरसंक्रांतीच्या गोड मानल्या जाणाऱ्या दिवशीच मांजवाडीत एका झोपडीला आग लागून छोटासा संसार उघड्यावर पडला. गुरुवारी सकाळी पावणे अकरा वाजता ही घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, मांजरवाडी (ता.जुन्नर) येथील गायकवाड मळ्यात शेती करणारे ठाकर समाजातील शेतमजूर राजेंद्र रोहिदास दुधाने यांच्या झोपडीला गुरुवार दि.१४ रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत रोख रक्कम ९५ हजार रुपये, २२ पोती धान्य, भांडी, कपडे, शेतीची अवजारे, पाण्याची टाकी, कपडे, डिश, टीव्ही, भांड्यांची मांडणी, महत्वाची कागदपत्रे आणि अन्य संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. या आगीत २ लाख १७ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.गावकामगर तलाठी नामदेव सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
सदर आगीच्या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र ग्रामस्थ येथे पोहोचण्यापूर्वीच सर्व काही जळून खाक झाले होते. राजेंद्र दुधाने यांचा स्वभाव अत्यंत कष्टाळू आणि गरीब असल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
१४खोडद
गायकवाड मळ्यातील राजेंद्र दुधाने यांच्या झोपडीला लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.