प्रवासी संतप्त : पुणे-लोणावळा लोकलसाठी सिझन तिकिटाचे बंधन
प्रसाद कानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे-लोणावळा लोकल प्रवासासाठी दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना मुभा देण्यात आली. त्यासाठी युनिव्हर्सल पासची सोय करण्यात आली. मात्र, त्यासाठी प्रवाशांना महिन्याभराचे तिकीट काढावे लागते. जरी तुम्हाला एक दिवसापुरता प्रवास करायचा असेल, तरी महिन्याचे तिकीट काढावे लागते. एका महिन्याच्या तिकिटाचे बंधन केल्याने प्रवाशांचे आर्थिक नुकसान होत आहे. रेल्वेची सक्ती प्रवाशांना अन्यायकारक ठरत असल्याने अनेक प्रवाशांनी पुणे-लोणावळा लोकलकडे पाठ फिरविली आहे.
१५ ऑगस्टपासून पुणे-लोणावळा लोकलसाठी ‘युनिव्हर्सल पास’ची सुविधा सुरू झाली. रोज साधारणपणे २ ते ३ प्रवासी हा पास काढत आहे. पुणे ते लोणावळा महिन्याचा पास (सिझन तिकीट) दर २७० रुपये आहे. तर एका वेळच्या प्रवासाचे तिकीट दर १५ रुपये आहे. त्यामुळे अनेक प्रवासी आज ही पुणे-लोणावळा प्रवासासाठी अन्य प्रवासी साधनांचा वापर करीत आहे. लोकल ही केवळ रेल्वे कर्मचारी व महिन्याचे तिकीट काढलेल्या प्रवाशांना घेऊन धावत आहे. ह्या निर्बंधमुळे अजूनही सामान्य प्रवासी लोकल सेवेपासून दूरच आहे.
चौकट
पन्नाससुद्धा पासची विक्री नाही
पुणे-लोणावळा एमएसटीला (मंथली सिझन तिकीट) प्रवाशांचा खूप कमी प्रतिसाद लाभत आहे. १५ ऑगस्ट पासून रेल्वे स्थानकावर महापालिकेच्या वतीने युनिव्हर्सल पास देणे सुरू झाले. पुण्यात दोन डोस घेतलेल्यांची संख्या जास्त असताना देखील एमएसटीसाठी प्रवासी इच्छुक नाही. १५ ते १ सप्टेंबर दरम्यान केवळ ३० ते ४० सिझन तिकीट म्हणजेच पासची विक्री झाली. याचे सर्वांत महत्वाचे कारण म्हणजे अजूनही पूर्वीप्रमाणे सामान्य तिकीट देणे सुरू झाले नाही.
चौकट
“रेल्वेचा हा निर्णय प्रवाशांसाठी अन्यायकारक आहे. रेल्वेनी स्वतःची सोय न पाहता प्रवाशांची सोय पाहिली पाहिजे. रेल्वेने सिझन तिकीटची सक्ती काढून प्रवाशांना दिलासा द्यावा.”
-हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप.
चौकट
“राज्यात आता सर्वच गोष्टीवरील निर्बंध हटविण्यात आले आहेत. रेल्वेने देखील सर्व प्रमुख गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, पॅसेंजर गाड्या व जनरल तिकीट बंद आहे ते सुरू झाले पाहिजे. जनरल तिकीट सुरू झाल्यानंतर ‘एमएसटी’चा देखील प्रश्न सुटेल. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यायला हवे.”
-दिलीप होळकर, नियमित प्रवासी.
चौकट
“गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. हा विषय पुणे विभाग स्तरावरचा नाही.”
-मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे.