पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यभरातील सर्व पोलीस ठाण्यात अंमलदारांची धुरा ठाण्यातील पोलीस महिला कर्मचारी यांच्याकडे सोपवून वेगळ्या पद्धतीने सन्मान करण्यात आला. पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील बहुतेक सर्व पोलीस ठाण्यांत याची अंमलबजावणी झाली. महिलांचा सन्मान करण्याची ही अत्यंत चांगली कल्पना असली, तरी ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना किमान मूलभूत सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा अनेकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.पोलीस दलात महिलांची संख्या मुळातच कमी असून, ग्रामीण भागात तर ही संख्या खूपच कमी आहे. महिला दिनानिमित्त मंगळवारी ‘लोकमत’च्या वार्ताहरांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात जाऊन या महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये ठाणे अंमलदाराची भूमिका बजावताना आलेल्या अनुभव व अचडणी यांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये बहुतेक पोलीस ठाण्यांत महिला कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने त्यांच्या मूलभूत सुविधांकडेदेखील दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास आले. यात प्रामुख्याने अनेक पोलीस ठाण्यांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व रेस्ट रूम नसल्याचे समोर आले. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनादेखील अनेक वेळा २४ तास आॅन ड्युटी राहावे लागते. अशा वेळी रेस्ट रूमची सुविधा असणे अत्यंत आवश्यक असते; परंतु या अत्यावशक सुविधांकडेचे दुर्लक्ष केले जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
एक दिवसाचा सन्मान चांगली कल्पना, पण..
By admin | Published: March 09, 2016 12:53 AM