- राजू इनामदार
दाट लोकवस्तीचा भाग, रस्ते म्हणजे निव्वळ गल्लीबोळ, त्यातल्याही निम्म्या रस्त्यांची एक बाजू कचऱ्याने ओसंडून वाहणारी, लोकही असेच. बहुतेक सगळे कष्टकरी. पिणारे. त्यामुळे अनेक ठिकाणी भांडणे सुरू असायची. त्यातल्या त्यात शब्दांचा मारा असा असायचा, की ते कानावर पडले तरी रस्त्याने चालणारी साधी माणसे मान खाली घालून पुढे निघायची. जवळच टिंबर मार्केट.
सोनमर्ग म्हणजे भांगेतील तुळस
अशा या बदनाम वस्तीत भांगेत तुळस उगवावी तसं एक चित्रपटगृह अवतरलं. प्रशस्त आवार. इतकं प्रशस्त की त्याच्या एका कोपऱ्यात चक्क बाग होती. समोरच्या बाजूला आडवं पसरलेलं थिएटर. स्टॉल, बाल्कनी तिकिटांसाठी स्वतंत्र व्यवस्था, रांगेत उभं राहता यावं म्हणून लोखंडी बार लावलेले. आधीचा खेळ सुटण्याअगोदर आलेल्या प्रेक्षकांसाठी मोकळी जागा. प्रतीक्षागृह, प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक मोठी लॉबी. तिथेच कँटीन, आगामी चित्रपटांचे पोस्टर लावलेल्या भल्या मोठ्या काचेच्या शोकेस.
आलिशान थिएटर
प्रेक्षागृहही दृष्ट लागावं असंच होतं. भलं मोठं, पडदाही मोठा. प्रोजेक्टरमधून प्रकाशाचा झोत पडद्यावर पडला, की संपूर्ण पडदा प्रकाशमान व्हायचा. चित्रपट गाजलेला असेल, तर मग लगेचच टाळ्या, शिट्ट्यांची बरसात व्हायची. खुर्च्या कुशनच्या. खरे तर त्या भागात अशा खुर्च्या म्हणजे चैनच म्हणायची. दोन रांगांमध्ये पुरेशी जागा. साउंड सिस्टिम तर एकदमच भारी होती. चित्रपटगृह वातानुकूलित असावे, किंवा मग कूलिंग असेल, मात्र पंख्यांवरच सगळे भागायचे. रंगरंगोटी, स्वच्छता, दिव्यांची व्यवस्था या सगळ्यातच सोनमर्ग त्या परिसराशी नाते जोडणारी नाही तर फटकून राहणारी होती.
बदनाम होण्यास सुरुवात
‘अमर अकबर अँथनी’ने इथे बराच काळ तळ ठोकला होता. तो पिक्चर जसा होता, तसंच मिश्र जाती-धर्माचं पब्लिक या थिएटरला यायचं. अगदी तशीच गर्दी. थिएटर मोठं असल्यानं तिथं चांगले, गाजणारे चित्रपट लागायचे. त्यामुळे गर्दी नेहमीच असायची. चित्रपटगृहाची मॅनेजमेंट चांगली, कडक होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात ब्लॅक वगैरे चालायचं नाही. पण, हळूहळू ते सुरू झाले. वस्तीचा प्रभाव वाढू लागला. जवळच महापालिकेची कॉलनी होती, त्याचबरोबर वस्तीही. त्यांच्या घरातून चित्रपटगृहाची तिकीट खिडकी दिसायची. त्यामुळं तिथलीच व तीच तीच गर्दी तिथे दिसू लागली.
समोरच बांधली गेली इमारत
त्यांचाच वचक सुरू झाला. हाऊसफुल्ल पिक्चरची एकगठ्ठा तिकीट खरेदी, त्यांचा काळा बाजार, स्टँडवरून, तिकिटांवरून भांडणे याचा भर सुरू झाला. पण, चित्रपटगृह त्यामुळे बंद पडले, असे म्हणता येणार नाही. त्या काळात असे अपवाद वगळता बहुसंख्य थिएटरमध्ये हे सुरू असायचेच. स्थानिक टपोरी लोक त्या त्या थिएटरवर कब्जा करायचेच. त्यामुळे गोष्ट ती नव्हती, तर मोठी जागा हाच या थिएटरचा काळ ठरला. त्यावरून मालक लोकांमध्ये काही वाद झाला, असे म्हणतात. समोरच्या रिकाम्या जागेत एक भले मोठे व्यावसायिक संकुल तिथे बांधण्यात आले. त्यामुळे रस्त्यावरून दिसणारा थिएटरचा दर्शनी भाग झाकला गेला.
खंडहर होण्याकडे वाटचाल
काश्मीरमधील गुलमर्ग समजल्या जाणाऱ्या सोनमर्गचे खंडहर होण्याची ती सुरुवात होती. तरीही ते सुरू होते. मात्र त्याच्या वैभवाला गळती लागली. दिसतच नाही, त्या थिएटरला जाणार कोण? गर्दी ओसरू लागली. अवकळा सुरू झाली. रंग उडाला, चांगले लोखंडी कठडे पडले. भिंतींना पोपडे पडू लागले. खुर्च्या पत्र्याच्या झाल्या. त्यातल्याही अनेक तुटू लागल्या. कर्मचारी कोणालाच जुमानेनात. त्यातून भांडणे वाढली. ही सगळी परवड खुद्द मालकांनाच बहुधा पाहणे पसंत पडेना. त्यांनी अखेर सोनमर्गवर कायमचाच पडदा टाकला.