धनकवडी : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चंद्रभागा नगर चौकात भरदिवसा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी ११.४५ वाजता घडली. दोघांनी दुचाकीवरून येऊन एका व्यक्तीवर गोळीबार केला. यामध्ये संबंधित व्यक्तीचा जागेवर मृत्यू झाला असून समीर मनूर शेख, (वय २८ वर्षे, रा. फालेनगर, भारती विद्यापीठ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस दाखल झाले असून, त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, समीरला नुकतेच बारामती मतदारसंघ काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष म्हणून पद मिळाले होते. याशिवाय तो बांधकाम व्यावसायिक म्हणून सुद्धा काम करत होता. समीरच्य घरी आई वडील, पत्नी आणि सहा महिन्याचा मुलगा असा परिवार आहे. भरदिवसा आणि गजबजलेल्या त्रिमूर्ती चौकातून दत्तनगर कडे जाणाऱ्या गजबजलेल्या रस्त्यावर झालेल्या या घटनेने कात्रज आणि धनकवडी परिसरात खळबळ उडाली. घरातून बुलेट वर बाहेर पडलेला समीर हा चहा पिण्यासाठी चंद्रभागा चौकात आला होता. दरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर बेछूटपणे तब्बल सहा गोळ्या झाडल्या. डोक्यावर झालेल्या या गोळीबारात समीरचा जागीच मृत्यू झाला आहे.
बारामती लोकसभा मतदार संघाचे अल्पसंख्यांक अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती
समीर मनूर यांची काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदार संघाचे अल्पसंख्यांक अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती. त्याचबरोबर आंबेगाव परिसरातील दत्तनगरमध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्या हस्ते जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले होते. मनूर यांच्या खुनामागे आर्थिक देवघेव असल्याचे कारण स्पष्ट होत असून या प्रकरणी एका संशयित व्यक्तीला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मेहबुब भळुरगी असे ताब्यात घेतलेल्या व्यक्ती चे नाव आहे. तो समीर चा मित्र होता.