पुणे : प्रेमसंबंध असताना मारहाण केल्याने तिने त्याच्याशी ब्रेकअप केला. त्या रागातून तरुणाने भरदिवसा सदाशिव पेठेत कोयत्याने वार करुन तिच्यावर संपविण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथे असलेल्या तरुणांनी पुढाकार घेऊन या माथेफिरुला पकडल्याने तिचे प्राण वाचले. लोकांनी त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. शंतनू लक्ष्मण जाधव (वय २२, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) असे या माथेफिरुचे नाव आहे. प्रसंगावधान राखल्याने ही तरुणी थोडक्यात वाचली असून किरकोळ जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
याबाबत २१ वर्षाच्या तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सदाशिव पेठेतील स्वाद हॉटेलसमोर मंगळवारी सकाळी १० वाजता घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे.दरम्यान, एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी राहुल हंडोरे याने खून केल्याची घटना नुकतीच घडली. राहुलने दर्शनाकडे विवाहाबाबत विचारणा केली होती. दर्शनाने त्याला झिडकारले होते. त्यानंतर त्याने दर्शनाला फिरायला नेण्याच्या बहाण्याने राजगड किल्ला परिसरात नेऊन खून केल्याची घटना १२ जून रोजी घडली होती. त्यानंतर सदाशिव पेठेत मंगळवारी ही घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी टिळक रोडवरील एका इस्टिट्यूटमध्ये इंटेरियर डिझायनरच्या प्रथम वर्षात शिक्षण घेते. कोथरुडमधील महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असताना तिचा शंतनु याच्यासोबत परिचय झाला होता. सुरुवातीला मैत्री आणि त्यानंतर दोघामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र शंतनु हा छोट्या-छोट्या कारणातून तरुणीला शिवीगाळ करून मारहाण करत असे. त्यामुळे तरुणीने डिसेंबर २०२२ मध्ये त्याच्यासोबत असलेले प्रेमसंबंध तोडले. त्यानंतर देखील तो तरुणीला फोन करत होता. भेटण्यासाठी न आल्यास मारहाण करण्याबरोबर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. त्यामुळे तिने त्याला ब्लॉक केले होते. त्यामुळे शंतनु हा तरुणीवर चिडून होता.
भररस्त्यावरील थरारही तरुणी मंगळवारी सकाळी परीक्षा असल्याने बसने ग्राहक पेठ येथे उतरली. त्यावेळी शंतनु समोर होता. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने तुझ्याशी बोलायचे नाही, आईशी बोल, असे सांगून ती चालत जाऊ लागली. तिने एका मित्राला बोलावून घेतले. ती चालत चालत पेरुगेट पोलीस चौकीजवळील स्वाद हॉटेलजवळ आली. तोपर्यंत तेथे तिचा मित्र दुचाकीवरुन आला. ती त्याच्या दुचाकीवरुन जाऊ लागताच शंतनूने तिचा हात धरुन माझे ऐक नाही तर तुला आज मारुनच टाकतो, आज एकतरी मर्डर करतोच, अशी धमकी दिली. हे ऐकून तिच्या मित्राने दुचाकी थांबविली. तो गाडीवरुन उतरला. तोपर्यंत शंतनू याने त्याच्याकडील बॅगेतून कोयता काढून त्याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. त्याने वार चुकवून तो पळाला. त्यानंतर शंतनूने आपला मोर्चा या तरुणीकडे वळविला. हे पाहून ती पळून जाऊ लागली. तो तिच्या मागे कोयता घेऊन धावू लागला. तिच्या डोक्यात तो वार करणार, तितक्यात तिचा पायात पाय अडकून ती खाली पडली. त्यामुळे तिच्या डोक्याला निसटता वार लागला. त्यानंतरही शंतनूने तिच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. तिने हातमध्ये घातल्याने हाताच्या मनगटाला लागला. तिने शंतनूला ढकलून पळून लागली. तोपर्यंत लोक जमले. तेव्हा त्याने त्यांच्यावर कोयता उगारला. तरीही त्यातील काही जणांनी त्याला पकडले. लोकांनी त्याला बेदम चोप दिला. तिला पोलीस चौकीत नेले. तेथून रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली.
'तो' मदतीला आल्याने वाचली तरुणी- अनेकदा रस्त्यावर कोणी हल्ला केला तर लोक बघ्याची भूमिका घेतात. काही व्हिडिओ करतात. एमपीएससी करणारे तरुण या परिसरात असतात. ते या तरुणीच्या मदतीला धावल्याने ती माथेफिरुच्या तावडीतून वाचू शकली.
मी दुकानामध्ये काम करत होतो. माझं लक्ष अचानक एका मुलीकडे गेलं. ती मुलगी पेरुगेट पोलिस चौकीच्या दिशेने पळत आली. तिच्या मागे एक मुलगा पळत आला. त्याच्या हातात कोयता होता. ती मुलगी पळत असताना अंबिका स्वीट होम जवळ पाय घसरून पडली. त्याने त्या मुलीवर वार करण्याचा प्रयत्न केला. स्वतःला वाचवण्यासाठी तिने हात आडवा केला. तर कोयत्याचा वार हातावर झाला. हे दिसताक्षणी मी धावत तिथे गेलो. माझ्या सोबत एक मुलगा होता. त्याने त्या मुलाला पकडले. तोपर्यंत लोकांचा जमाव झाला. लोकांनी त्याला पकडले आणि बेदम मारहाण केली. इतका मार खाऊन सुद्धा तो उठून तिला मारण्याचा प्रयत्न करत होता. मी त्या मुलीला धीर देत पोलिस चौकीमध्ये नेले. तेथे कोणी नव्हते. मग आम्ही पोलिस चौकीचे दार आतून लावून घेतले. काही वेळाने पोलिस तेथे पोहचले.
- गजानन सूर्यवंशी (प्रत्यक्षदर्शी)