Ajit Pawar on Devendra Bhuyar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार हे महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चांगलेच वादात सापडले आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना देवेंद्र भुयार यांनी महिलांविषयी धक्कादायक विधान केलं. भुयार यांनी केलेल्या विधानावरुन अजित पवार आणि महायुतीच्या अडचणीत वाढ झाली आहे. महिलांविषयी केलेल्या वक्तव्यावरुन विरोधकांनी भुयार यांना धारेवर धरलं आहे. मात्र आता अजित पवार यांनी या सगळ्या प्रकारावर भाष्य केलं आहे. आमदार देवेंद्र भुयारांना अजित पवारांनी समज दिली आहे.
आमदार देवेंद्र भुयार यांनी मुलींच्या दिसण्याबद्दल केलेल्या विधानावरुन मोठा गोंधळ उडाला आहे. एका कार्यक्रमात बोलत असताना देवेंद्र भुयार यांनी महिला आणि मुलींविषयी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र हा व्हिडीओ जुना असल्याचं सांगत देवेंद्र भुयार यांनी स्पष्टीकरण दिलं. भुयार यांच्या या विधानावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलताना भाष्य केलं आहे. देवेंद्र भुयार यांचे वक्तव्य महिला व मुलींना वेदना देणारे असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
"तरूण मुलगा शेतकरी असेल, तर त्याला लग्नाला कुणी मुलगी देत नाही, अशी परिस्थिती आहे. एक नंबर स्मार्ट, देखणी मुलगी हवी असेल तर ती तुमच्या माझ्यासारख्यांना भेटत नाही, ती नोकरीवाल्याला भेटते. दोन नंबरची मुलगी ही कुणाचा छोटा-मोठा व्यवसाय असेल, किराणा दुकान असले, तर त्याला मिळते अन् तीन नंबरचा जो गाळ गाळ शिल्लक राहते… ती पोरगी शेतकऱ्याच्या पोराला मिळते. म्हणजे शेतकऱ्यांच्या पोराचे काही खरे राहिले नाही. शेतकऱ्याचे जन्माला येणारे जे लेकरू आहे ते हेबंळ्ळ हांबळ्ळच निघत राहते. मायं इल्लू पिल्लू अन् त्याच्या पोटी वानराचे पिल्लू असाच कार्यक्रम आहे आपला सगळा," असं देवेंद्र भुयार यांनी म्हटलं होतं.
भुयार यांचे वक्तव्य मुलींना वेदना देणारे - अजित पवार
"देवेंद्र भुयार यांनी केलेलं वक्तव्य अतिशय चुकीचे आहे. त्याला मी यासंदर्भात दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले. माझ्याकडून बोलण्याच्या ओघात अशाप्रकारचे वक्तव्य गेलं. ते अत्यंत चुकीचे होते. मुलींना वेदना देणारे होते. शेतकऱ्यांना अपमान वाटणारे होतं, असं कालच रात्री मी त्याला सांगितलं. कारण पाच वर्ष त्याने माझा सहयोगी म्हणून काम केलं आहे," असं अजित पवार म्हणाले.
देवेंद्र भुयारांचे स्पष्टीकरण
"मध्य प्रदेशमध्ये २०१९ मध्ये एका जाहीर कार्यक्रमात आयोजकांनी दिलेल्या त्या विषयावरील हे विधान आहे. या विधानाचा आता कुठेही काहीही संबंध नाही. महिलांचा अपमान किंवा टीका करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यावेळी पोरांना लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. म्हणूनच तेव्हाची वास्तुस्थिती मांडली," असं स्पष्टीकरण देवेंद्र भुयार यांनी दिलं.