Pune Heavy Rain :पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पु्ण्या्च्या भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्याच्या नदीकाठच्या भागात अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. पुण्यात रात्रभर पावसाची संततधार असून भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यांना पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून ४५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना पत्रकार परिषद घेत अतिवृष्टीबद्दल माहिती दिली.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिमुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत खडकवासला धरण परिसरात हंगामातील विक्रमी पाऊस झाला. गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे हे धरण ओवरफ्लो झाले. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पुण्याच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यानंतर एनडीआरएफच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत पाणी सोडण्याचे कारण सांगितलं आहे.
"पुण्यातल्या एकता नगर, निम्बज नगर या भागात पाणी वाढलेलं आहे. काही इमारतींचे पहिले मजले पाण्याखाली गेले आहेत. त्यांना बोटीतून बाहेर काढण्यात येत आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली या भागात एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. बुधवारीच रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार, पुणे, पिंपरी-चिंचवड येथील शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर ही धरणे कमी भरली होती. या धरणातून अर्धा काळ पुरेल एवढेच पाणी होतं. खडकवासला धरणाच्या परिसरात आठ इंचापेक्षा जास्त पाऊस पडला. पुण्यात जवळपास पाच इंचापर्यंत पाऊस पडला. दोन्ही भागात जोरदार पाऊस झाला. खडकवासा धरणाची क्षमता कमी असल्याने ते लगेचच भरले. तीन टीएमसीपेक्षा अधिक पाणी आल्याने धरणाचे दरवाजे उघडावे लागले. त्यामुळे जवळपास ४५ हजार क्युसेक पाणी खडकवासला धरणातून सोडण्यात आलं. पाण्याचा प्रवाह सोडत असताना आम्ही ते पहाटे सोडण्याचा निर्णय घेतला. रात्री सोडले असते सलख भागात पाणी जाऊन लोकांना त्याचा त्रास झाला असता. त्यामुळे पहाटे पाणी सोडल्यानंतर आतापर्यंत ते बंडगार्डन पर्यंत पोहोचलं आहे," अशी माहिती अजित पवारांनी दिली.
१८ ठिकाणी एनडीआरएफची पथके
"हवामान खात्याने पुढील पाच दिवसांचे अंदाज वर्तवले आहेत. त्यानुसार काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर काहींना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास संबंधित ठिकाणी मदत व बचावकार्यासाठी आवश्यक सामग्री उपलब्ध करण्यात आली आहे. मुंबईतील कुर्ला व घाटकोपर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली अशा जिल्ह्यांमध्ये एकूण १८ ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके, तसेच ६ राज्य आपत्ती निवारण पथके तैनात करण्यात आली आहेत," असेही अजित पवार म्हणाले.