DCM Ajit Pawar News: कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणात दररोज नवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात पुणेपोलिसांनी आता अल्पवयीन कार चालकाची आई शिवानी अग्रवाल यांना अटक केली आहे. यापूर्वी पुणेपोलिसांनी अल्पवयीन कारचालकाचे वडील विशाल अग्रवाल आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही अटक केली आहे. हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यावरून राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका करण्यात आली. या टीकेला आता अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.
मीडियाशी बोलताना अजित पवार यांनी पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात होत असलेले आरोप फेटाळून लावले. पुणे अपघात प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , पुण्याचा पालकमंत्री म्हणून मी, आम्ही चौकशीचे आदेश दिले. चौकशी जसजशी पुढे सरकत गेली, तेव्हा या प्रकरणात अनेकांचा सहभाग दिसून आला. अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला होता. तो न्यायालयाने दिला. त्यात सरकारची कोणतीही भूमिका नव्हती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घातले तेव्हा अल्पवयीन मुलाविरोधात आणखी कलमे लावण्यात आली. चौकशीत दोन पोलीस अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्याचे समोर आले. त्यांच्यावरही कारवाई झाली, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
या प्रकरणात सरकार कोणतीही लपवाछपवी करत नाही
या प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉक्टर दोषी आढळले, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. अपघात घडला तेव्हा हसन मुश्रीफ परदेशात होते. ससून रुग्णालय त्यांच्या वैद्यकीय शिक्षण खात्याच्या कक्षेत येते. त्यांनीही संबंधितांच्या चौकशीचे आदेश दिले. उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनीही आपल्या खात्याल सूचना दिल्या. हे प्रकरण सगळ्यांनी गांभीर्याने घेतले आहे. दररोज तपास पुढे सरकत आहे, दोषींवर कारवाई केली जात आहे. या प्रकरणात सरकार कोणतीही लपवाछपवी करत नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो. वर्षभर काही ना काही कारणासाठी फोन करत असतो. पुणे पोर्शे कार अपघातानंतर त्यांना फोन करुन दोषींवर योग्य ती कारवाई करा, असे सांगितले. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हे सांगणे माझे काम आहे. पण या प्रकरणात काहीजण माझ्यावरच घसरले, असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला.