वडगाव मावळ : जांभूळ ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या सांगवीच्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. येथे अंत्यविधी करताना तात्पुरते पत्राशेड उभे करावे लागते. नातेवाईक झाड्याच्या फांद्यांचा आश्रय घेऊन चिखलात उभे राहून अंत्यविधी करतात. येथे सुविधा द्यावात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पावसाळ्यात मृतदेह घेऊन खांदेकऱ्यांना चिखलातून मार्ग शोधावा लागतो. खांदेकऱ्यांचा पाय चिखलात रुततो. त्यांचा तोल जात असल्याने चालता येत नाही. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दलदल, चिखल झाला आहे. वृद्ध व अपंग नातेवाइकांना अंत्यविधीच्या वेळी येता जाता येत नाही. महेश ओव्हाळ म्हणाले, ‘‘ग्रामस्थांना दलदल, निसरड्या व डबकेमय रस्त्यातून मार्ग काढून स्मशानभूमीकेडे ये- जा करावी लागत. अंत्यविधीसाठी तात्पुरते पत्राशेड उभे करावे लागते. काही वेळा वाऱ्याच्या वेगाने ते खाली पडते. जळत असलेले प्रेत पावसाच्या पाण्याने विजण्याच्या घटना घडतात. त्या वेळी नातेवाइकांना रात्री-अपरात्री पुन्हा प्रेत जाळण्यासाठी स्मशानभूमीत यावे लागते.’’ येथे दशक्रिया विधी सभामंडप, पिंडदानासाठी ओटा, येण्या-जाण्यासाठी रस्ता व निवारा शेड इत्यादी कामे करावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)
मृतदेहाला सोसाव्या लागतात यातना
By admin | Published: July 29, 2014 3:28 AM