बारामती : ३५ वर्षांपूर्वी निधन झालेल्या शेतकऱ्याच्या जागी तोतयाला उभा करून साडेपाच एकर जमीन हडप केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पळशी (बारामती) येथे ही फसवणूक झाली असून बारामती दुय्यम निबंधक कार्यालयात दोन वर्षांपूर्वी बनावट दस्त केले आहे. याप्रकरणी शंकर मारुती कोळेकर, रामदास मारुती कोळेकर, प्रमोद शंकर कोळेकर, सयाजी शंकर कोळेकर (सर्व रा. पळशी, ता. बारामती), तसेच ऊर्मिला आबासाहेब लोखंडे (रा. झारगडवाडी, ता. बारामती) यांच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मौजे पळशी (ता. बारामती) येथील गट क्रमांक ४ चे मालक जयवंत पांडुरंग महानवर यांचा १५/५/१९७९ साली माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे मृत्यू झाला होता. महानवर कुटुंब मूळचे पळशी (ता. बारामती) येथील आहे. कामानिमित्त ते नातेपुते येथे स्थायिक झाले आहेत. त्याचा फायदा घेऊन वरील आरोपींना तोतयाला उभे करून ती जमीन हडप केली.दोन वर्षांपूर्वी ही बाब उघड झाल्यानंतर मयत जयवंत महानवर यांचा मुलगा छगन जयवंत महानवर यांनी तक्रार केली होती. तक्रारीदरम्यान वडिलांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र, बनावट खरेदी दस्त क्रमांक बमत/३५२/२०१२ यासह अन्य महत्त्वाचे कागदपत्रे सादर केली होती. त्याची छाननी केल्यानंतर बारामती शहर पोलिसांनी २३ डिसेंबर रोजी फसवणुकीसह बनावट दस्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात प्रमोद कोळेकर आणि सयाजी कोळेकर या दोघांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या. त्यांच्यावरदेखील गुन्हा दाखल झाला आहे. महानवर कुटुंब उपजीविकेसाठी पळशी गावातून १९७५ मध्ये नातेपुते (ता. माळशिरस) येथे गेले होते. १९७९ साली जयवंत महानवर यांचे निधन झाले. परंतु, त्यांच्या मुलांना गावाकडे जमीन असल्याची माहिती होती. गावच्या यात्रेनिमित्त आल्यावर त्यांना त्यांच्या साडेपाच जमिनीची विक्री झाल्याचे सांगितले. त्यानंतर तातडीने त्यांनी कागदपत्रे काढून तत्कालिन मंडलाधिकाऱ्यांकडे फेरफार नोंदीस आक्षेप घेतला. तरीदेखील नोंद करण्यात आली होती. मात्र, त्यावर त्यांनी अपिल केले. अपिलामध्ये मंडलाधिकाऱ्यांनी केलेल्या नोंदीला स्थगिती दिली. त्यानंतर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्याप आरोपींना अटक केली नाही. (प्रतिनिधी)४या प्रकरणात तत्कालिन दुय्यम निबंधक, तलाठी, मंडलाधिकारी यांनीदेखील आरोपींना मदत केली. त्यांच्यावरदेखील कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अंबादास पवार या सराईत आरोपी व त्याच्या टोळीचा तपास आपल्याकडे आहे. त्या टोळीला अटक केल्यापासून विविध ठिकाणचे गुन्हे उघड होत आहे. त्यामुळे या जमीन फसवणूक प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक केली नाही- जी. टी. संकपाळ , पोलीस उपनिरीक्षक