पुणे : मुळा-मुठा नदीमध्ये रसायनमिश्रीत दूषित पाणी आल्याने हजारो माशांचा मृत्यू झाला असून, नाईक बेट परिसरात त्यांचा खच पडल्याचे पहायला मिळत आहे. महापालिकेने या ठिकाणच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले असून, हे दूषित पाणी कुठुन आले, याचा शोध महापालिका घेत आहे. दरम्यान, नदीप्रेमींनी यावर तीव्र संताप व्यक्त केला असून, रसायनमिश्रित पाणी त्वरीत नदीत जाण्यापासून रोखावे, अशी मागणी होत आहे.
पुणे महापालिकेच्या ‘एसटीपी’ केंद्रातून निघणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे नाईक बेट येथील शेकडो मासे मृत्यूमुखी पडले आहेत, असा आरोप केला जात आहे. मुळा नदी आणि मुठा नदीचा संगम या नाईक बेटाच्या ठिकाणी होतो. तिथे अनेक मासेमार काम करत असतात. परंतु, अचानक शेकडो मासे मरून पडल्याचे दृश्य नाईक बेटजवळील पात्रात दिसून येत आहे.शहरातील मैलामिश्रित पाणी प्रक्रिया न करताच नदीत सोडले जाते, त्यामुळे नदी प्रदूषित झालेली आहे. शहरात दिवसाला किमान ९०० एमएलडी सांडपाणी तयार होत आहे. त्यापैकी प्रतिदिन केवळ ४५० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा नदीत सोडले जाते. पण तरीही ४५० एमएलडी पाणी थेट नदीमध्ये जात आहे. मुळा नदीमध्ये पिंपरी चिंचवडमधील कंपन्यांतून रसायनयुक्त पाणी नदीत येते. त्यामुळे हे विषारी पाणी नदीमधील जीवांसाठी धोकादायक ठरत आहे.मुळा-मुठा नदीच्या संगमाजवळ नाईक बेट आहे. त्या बेटाजवळच पात्रात मृत माशांचा खच पहायला मिळत आहे. त्यामुळे आजुबाजूला प्रचंड दुर्गंधी देखील पसरलेली आहे. या ठिकाणी महापालिकेचा नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पदेखील आहे. महापालिकेने या ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर माशांचा मृत्यू कशामुळे झाला, ते समजणार आहे. या विषयी त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी नदीप्रेमींनी केली आहे.