बेल्हा (पुणे): राजुरी (ता. जुन्नर) शिवारातील गोगडीमळा येथील शेतात शनिवार (दि 12) रोजी सकाळी मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. याबाबत माहिती अशी की, गोगडेमळा येथील शेतात बिबट्या मृतावस्थेत असल्याचे आज सकाळीच ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. यानंतर याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली.
आळे वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपाल संतोष साळुंखे, वनरक्षक त्र्यंबक जगताप व स्वप्नील हाडवळे हे घटनास्थळी आले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी मंगेश खिलारी यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. मृत बिबट्या मादी जातीचा दीड वर्षे वयाचा असल्याचे वनपाल संतोष साळुंखे यांनी सांगितले. बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला ते समजू शकले नाही. तर दोन बिबट्यांचे झुंजीत मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याचे वनविभागाने सांगितले.
दरम्यान राजुरी परिसरातील या शिवारात बिबट्याचा वावर असून अगदी वेळोवेळी सकाळी तसेच सायंकाळी बिबट्यांचे व त्यांचे बछड्यांचे दर्शन होत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी उमेश नायकोडी, निवृत्ती औटी व महेश औटी यांनी केली आहे.