पुणे : “मृत पूजा चव्हाणचा कोणताही लॅपटॉप किंवा मोबाईल माझ्याकडे नाही. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही,” असे भाजपा नगरसेवक धनराज घोगरे यांनी स्पष्ट केले आहे.
घोगरे यांच्याविरोधात बीडमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर घोगरे यांनी गुरुवारी (दि. ४) पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. वानवडी येथे पूजा चव्हाणचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला त्यावेळी नगरसेवक घोगरे घटनास्थळी उपस्थित होते.
घोगरे म्हणाले की, वानवडी परिसरात इमारतीवरून उडी घेऊन तरुणीने आत्महत्या केल्याचे मला कळाले तसा लोकप्रतिनिधी या नात्याने मी तातडीने त्या ठिकाणी पोहोचलो होतो. तिला उचलून मी रिक्षात ठेवले आणि पोलिसांना पहिला फोन मीच केला. तिचा मोबाईल आणि लॅपटॉप मला माहीत नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व गोष्टी ताब्यात घेतल्या.
घोगरे म्हणाले, “जिथे ही घटना घडली ते ठिकाण माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून तिथं पोहोचलो. तिचे नाव पूजा आहे हे देखील मला माहीत नव्हते. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेणे हे माझं प्राथमिक कर्तव्य होते.”
चौकट
घोगरेंचा जबाब नाही
पूजासंदर्भातली माहिती आपणच पोलिसांना फोन करुन दिली, असे घोगरे उघडपणे सांगत आहेत. पण पोलिसांनी मात्र अजूनही त्यांचा जबाब नोंदविलेला नाही. इतकेच नाही तर अरुण राठोड आणि विलास चव्हाण या व्यतिरिक्त कोणतेही जबाब या प्रकरणी नोंदवले गेलेले नाहीत. घटनास्थळी उपस्थित आणि या घटनेचा महत्त्वाचा साक्षीदार असणाऱ्या व्यक्तीचा जबाब का नोंदवला गेला नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. घोगरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, “जबाबासंदर्भात पोलिसांकडून मला कोणतीही विचारणा झालेली नाही. त्यांनी संपर्क साधला तर मी जबाब द्यायला तयार आहे.”
चौकट
पोलीस म्हणतात...
वानवडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले “या प्रकरणातल्या महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. तपासाची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. आवश्यकता भासेल तेव्हा घोगरेंचाही जबाब नोंदवला जाईल.”