पुणे - न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य परिवहन विभागाने कर्णबधिर व्यक्तींना वाहन परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्रकच सर्व परिवहन विभागांना पाठविण्यात आले असून, त्याच्या मागदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. अमित अशोक त्रिभुवन व प्रादशिक परिवहन अधिकारी या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने कर्णबधिर व्यक्तींना वाहन परवाना देण्याता आदेश दिला होता. त्यानुसार केंद्रीय वाहतूक विभागाने कर्णबधिर व्यक्तींना परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने राज्य परिवहन आयुक्तालयाने परवान्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. याबाबत आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सच्या (एआयआयएमएस) वतीने कर्णबधिर व्यक्तींना परवाना देण्याबाबतचे मत देखील आदेशात नमूद करण्यात आले आहेत. वाहन चालविण्यासाठी दृष्टी महत्त्वाची असते. त्याच ऐकण्याचा वाटा हा तुलनेने कमी असतो. त्यामुळे कर्णबधिरत्व असणाºयांना परवाना देण्यास हरकत नाही. ज्या व्यक्ती श्रवणयंत्र लावतात त्यांना देण्यास हरकत नसावी, असे मत मेडिकल सायन्सने व्यक्त केले आहे. अगदी दक्षता घ्यायची असेल, तर संबंधित वाहनावर चालक कर्णबधिर आहे, असे दर्शविणारे चिन्ह लावावे. अशा व्यक्तींची चाचणी देखील इतरांप्रमाणेच घेण्यात यावी, असेही त्यात नोंदविण्यात आले आहे. या पत्रानुसार उच्च न्यायालयाने कर्णबधिर व्यक्तींना वाहन परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णबधिर अर्जदारांना शिकाऊ परवाना देताना शारीरिक योग्यतेचा अर्ज, प्रतिज्ञापत्र आाणि वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्जदाराला नेहमीच्या आवाजाचे सिग्नल्स एक, श्रवणयंत्र लावून अथवा न लावून सिग्नल एकू न येण्याइतके बहिरे आहे का ? असे प्रमाणित करावे लागेल. त्यानुसार कर्णबधीर व्यक्तींची सर्वसाधार व्यक्तींप्रमाणे वाहन परवाना चाचणी घेण्यात यावी. हलके मोटार वाहन चाचणीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र १ व १-अ सर्व आवश्यक कागदपत्रांसह जोडणे आवश्यक असल्याचे त्यात म्हटले आहे.
कर्णबधिरांना मिळणार वाहन परवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2017 3:47 PM