परिंचे : वीर धरण परिसरात चारावयास नेलेल्या बकऱ्यांना विषबाधा होऊन जवळपास १०० मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. खंडाळा तालुक्यातील तोंडल गावाच्या हद्दीमध्ये साई इंटरनॅशनल हॉटेलच्यासमोरील धरण परिसरात ही दुर्घटना घडली. या घटनेत जवळपास ४१० मेंढ्या अत्यवस्थ आहेत. यामुळे मेंढ्यांच्या मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे या परिसरात राज्याच्या अनेक भागांतून मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारावयास घेऊन येतात. दुर्घटनाग्रस्त मेंढ्या पुरंदर तालुक्यातील मेंढपाळांच्या आहेत. ७५० मेंढ्या घेऊन बेलसर येथील दगडू बबन मोटे व अण्णा बबन मोटे तसेच वाल्हे गावचे गुलाब नारायण मदन हे मेंढपाळ धरणालगत मेंढ्या चारत होते. मात्र, अचानक मेंढ्या मृत्युमुखी पडायला लागल्या. (वार्ताहर)काविळीची लक्षणेडॉक्टरांनी प्रथमदर्शनी केलेल्या तपासणीमध्ये मेंढ्यांना कावीळ व तापाची लक्षणे आढळून आली आहेत. ग्रामस्थांनीदेखील दूषित पाण्याने ही दुर्घटना घडली असावी, असे मत व्यक्त केले आहे. यामुळे अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तोंडलचे पोलीसपाटील तसेच अनिल कदम, हनुमंत जाधव, उत्तमराव कदम व महेंद्र सुतार या पंचांनी सांगितले. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून तहसील कार्यालयाकडे तो पाठवण्यात आला आहे.
विषबाधेमुळे १०० मेंढ्यांचा मृत्यू
By admin | Published: June 26, 2016 4:37 AM