चाकण : चाकण येथील खंडोबा माळावरील पौर्णिमा कल्याण ढेले या चौदा वर्षांच्या मुलीचा रुबेला इंजेक्शनच्या रिअॅक्शनमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात मयत झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ही घटना बुधवारी (दि. ३) रात्री साडेबाराच्या सुमारास पिंपरी येथील वायसीएम हॉस्पिटलमध्ये घडली. याबाबत वायसीएम पोलीस चौकीचे हवालदार लोखंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. याबाबत मुलीची आजी मंगल इंद्रजित उपाडे (वय ५०, रा.चाकण) यांनी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली आहे. चाकण येथील श्री शिवाजी विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत असलेल्या माझ्या पौर्णिमा नातीला २७ नोव्हेंबर २०१८ रोजी रुबेला लसीकरण अंतर्गत तिला इंजेक्शन दिले होते. त्या इंजेक्शनमुळे तिला रिअॅक्शन झाल्याने तिला चालता येत नव्हते. म्हणून तिला प्रथम उपचारासाठी चाकण येथील डॉ. पाबळकर हॉस्पिटल येथे नेवून नंतर सोलापूर जिल्ह्यातील सोरेगाव येथे खासगी दवाखान्यात नेले. व पुढील उपचारासाठी १८ मार्च २०१९ रोजी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी पिंपरी येथील वायसीएम हॉस्पिटल मधील आयसीयूमध्ये अॅडमिट केले. उपचार चालू असताना दिनांक ३ एप्रिल २०१९ रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास पौर्णिमा मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार हे या घटनेचा तपास करत आहेत.
रुबेला इंजेक्शनच्या रिअॅक्शनमुळे चाकणला चौदा वर्षीय मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 3:03 PM