पुणे : उर्दूचे गाढे अभ्यासक आणि उर्दू साहित्य परिषदेचे आधारस्तंभ आसिफ सय्यद (वय ७५) यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुलगे आणि दोन मुली असा परिवार आहे.
मराठी, हिंदी, उर्दू आणि संस्कृत या भाषांवर प्रभुत्व असलेले आसिफ सय्यद राजा धनराज गिरजी शाळेमध्ये शिक्षक म्हणून निवृत्त झाले होते. ‘उर्दू काव्यशास्त्र’, ‘मराठी गज़ल काव्यशास्त्र’ आणि ‘सफर हे शर्त’ ही त्यांची पुस्तके गाजलेली आहेत. डॉ. माधवी वैद्य यांच्या ‘धुक्यात हरवलेले पैंजण’ या कवितासंग्रहाचा त्यांनी ‘पलाश-गुल’ हा उर्दू अनुवाद केला होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेले उर्दू-मराठी महिला साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनामध्ये आसिफ सय्यद यांचे मोलाचे योगदान होते.
.............................................