बारामती : अंजनगाव (बारामती) येथील जळीत प्रकरणातील वडिलांचादेखील मुलापाठोपाठ मृत्यू झाला. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. वडील आणि मुलाला शेतीच्या वादातून भावानेच पेटवून दिल्याचा प्रकार शनिवारी (दि. ७) रात्री घडला होता. यामध्ये भाजून गंभीररीत्या जखमी झालेला रोझम जहांगीर मुलाणी (वय १३) या मुलाचा मंगळवारी (दि.१०)मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ त्याचे वडील जहांगीर मुलाणी यांचादेखील गुरुवारी (दि.१२)सकाळी ९ वाजता ससून रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. शेतीच्या वादातून सैन्यदलात नोकरी असलेल्या भावाने सख्ख्या भावाला व पुतण्याला पेटवून दिले होते. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. आरोपी शौकत नसीर मुलाणी याच्यासह त्याच्या पत्नीवर दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.शनिवारी मध्यरात्री गाढ झोपेत असताना शौकत याने घराच्या खिडकीतून पेट्रोल, डिझेल ओतून पेटवून दिले होते. या आगीत घरदेखील भस्मसात झाले. त्याचबरोबर ३ शेळ्यांचा मृत्यू झाला होता. जमिनीच्या वादात १३ वर्षांच्या रोझमसह जहांगीर यांचाही नाहक बळी गेला आहे. (प्रतिनिधी)
पेटवून दिलेल्या भावाचाही मृत्यू
By admin | Published: February 12, 2015 11:45 PM