पिंपरी : भाजपच्या नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे यांचा मुलगा पिस्तुलाची गोळी लागून जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चिंचवडेनगर, चिंचवड येथे रविवारी (दि. २८) रात्री सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली. पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रसन्न शेखर चिंचवडे (वय २१, रा. चिंचवडेनगर, चिंचवड), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसन्न याने कुटुंबीयांसमवेत रविवारी रात्री जेवण केले. त्यानंतर तो त्याच्या खोलीत गेला. त्यानंतर गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यामुळे घरातील सदस्यांनी त्याच्या खोलीकडे धाव घेतली असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्याला उपचारासाठी त्वरित थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रसन्नचे वडील शेखर चिंचवडे यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल आहे. याच पिस्तुलाची गोळी लागून तो जखमी झाला होता.