पाटेठाण : पिंपळगाव (ता. दौंड) येथे शुक्रवार (दि.१७) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरात अचानक झालेल्या विजेच्या शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत दाम्पत्याचा होरपळून जागीच मृत्यू झाला. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे दौंड तालुक्यात शोककळा पसरली आहे.या दुर्दैवी घटनेत एकनाथ महादू शिंदे (वय ५५) व त्यांच्या पत्नी सुनीता एकनाथ शिंदे (वय ५०) दोघेही या आगीत मृत्युमुखी पडले. तर त्यांचा मुलगा रवींद्र एकनाथ शिंदे हा देखील भाजून जखमी झाला आहे. पिंपळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मागच्या बाजूला रवींद्र शिंदे यांचे घर आहे. मध्यरात्री एकच्या दरम्यान ही घटना घडली. आगीचे लोट इतके प्रचंड होते, की घराच्या छतावरील पत्रेदेखील फुटले असून संसारोपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत एकनाथ शिंदे जागीच तर सुनीता शिंदे यांचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. मुलगा रवींद्र शिंदे आग विझवताना जखमी झाला असून त्याच्यावर राहू येथील दवाखान्यात उपचार चालू आहेत. अचानक झालेल्या या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. एम. वाणी करत आहे.
विजेच्या शॉर्टसर्किटने दाम्पत्याचा मृत्यू
By admin | Published: February 19, 2017 4:52 AM