लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कॅम्पमधील दोहराबजीच्या गेटबाहेर गाडीवर दोन मित्र थांबले असताना कारची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने पुढचा तरुण उडून फेकला गेला. त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. २० मे रोजी हा प्रकार घडला. अकरा दिवस अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज दिल्यानंतर बुधवारी सकाळी त्याचे निधन झाले. त्याच्या अपघातास जबाबदार असणारा व्यक्ती कोण? त्याला अद्याप अटक का झाली नाही? तो बड्या व्यक्तीचा मुलगा आहे म्हणून तपासात टाळाटाळ केली जात आहे का? पोलीस केवळ तपास चालू आहे अशी भाषा करीत आहेत. मागणी करूनही आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखविण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मृत तरुणाच्या मित्रांनी केला आहे. लेबिन मार्टीन (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात होऊन अकरा दिवस झाले तरी गुन्हेगाराला अटक झालेली नाही. मित्राने सांगितल्यानुसार, दोहराबजीच्या गेटबाहेर दुचाकीवर थांबलेला असताना त्यांच्या दुचाकीला कारने जोरदार धडक दिली. मात्र, कार थांबली नाही. त्याचा नंबरही आम्ही उतरवून घेऊ शकलो नाही. याप्रकरणी निखिल नाळे (रा. उत्तमनगर) याने बंडगार्डन पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. ती व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही सीसीटीव्ही फुटेज दाखविण्याची मागणी पोलिसांना केली; मात्र त्यांनी आम्हाला पुणे स्टेशन परिसरातले फुटेज दाखविले. पोलीस निरीक्षक केतकी चव्हाण यांच्याकडे याचा तपास होता; मात्र आता रामदास खोमणे (क्राइम गुन्हे) यांच्याकडे हा तपास वर्ग करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अपघात केलेल्या व्यक्तीचा तपास सुरू आहे, त्याच्या नातेवाइकाचा शोध अद्याप लागलेला नाही. आम्हाला आरोपीची माहिती मिळाली आहे, लवकरच त्याला अटक केली जाईल.
वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
By admin | Published: June 01, 2017 2:41 AM